दहावीत अनुत्तीर्ण पण एटीकेटी मिळालेल्यांना प्रवेशाची संधी; ३२ हजार प्रवेश तर २२ हजार जागा रिक्त
By निशांत वानखेडे | Updated: October 10, 2023 17:50 IST2023-10-10T17:50:46+5:302023-10-10T17:50:59+5:30
दहावीच्या परीक्षेत सहापैकी ४ विषय उत्तीर्ण करून दोन विषयात अपयशी ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी एटीकेटी धारनाने पुढल्या वर्गात म्हणजे ११ वीत प्रवेश देण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने यापूर्वी घेतला आहे.

दहावीत अनुत्तीर्ण पण एटीकेटी मिळालेल्यांना प्रवेशाची संधी; ३२ हजार प्रवेश तर २२ हजार जागा रिक्त
नागपूर : दहावीच्या परीक्षेत सहापैकी ४ विषय उत्तीर्ण करून दोन विषयात अपयशी ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी एटीकेटी धारनाने पुढल्या वर्गात म्हणजे ११ वीत प्रवेश देण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने यापूर्वी घेतला आहे. अशा एटीकेटीप्राप्त विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश समितीच्या ७ व्या फेरीपासून सुरू करण्यात आली आहे. ही अंतिम फेरी आजपासून सुरू होत आहे. केंद्रीय प्रवेश समितीतर्फे राबविण्यात येत असलेल्या प्रवेश प्रक्रियेच्या सहा फेऱ्या आटोपल्या आहेत.
अंतिम फेरी ११ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. यात एटीकेटी प्राप्त विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग सुरू होत आहे. या विद्यार्थ्यांनी नोंदणी करून प्रवेशाचा भाग-२ म्हणजे महाविद्यालयाचा पसंतीक्रम भरून लॉक करायचा आहे. भाग १ भरताना विद्यार्थ्यांनी सहा विषयाच्या ६०० पैकी मिळालेले गुण नोंदवायचे आहेत. याशिवाय आधी कॉलेज मिळाल्यानंतरही प्रवेश न केल्याने प्रतिबंधित केलेल्या विद्यार्थ्यांनाही या फेरीमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी १३ ऑक्टोबर सायंकाळी ६ वाजतापर्यंत भाग २ भरून अर्ज लॉक करायचा आहे. १४ ऑक्टोबर रोजी प्रवेश यादी तयार करून १६ ऑक्टोबरला संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. विद्यार्थ्यांना १७ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन प्रवेश निश्चित करायचे आहेत.
दरम्यान प्रवेश प्रक्रियेच्या सहाव्या फेरीनंतर ५४,५६० जागांपैकी ३२,११९ जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत. अद्यापही २२,४४१ जागा रिक्त राहिल्या आहेत. कला शाखेच्या जवळपास ७० टक्के, वाणिज्य शाखेच्या ६० टक्के तर विज्ञान शाखेच्या ३० टक्के जागा रिक्त आहेत.
कोणत्या शाखेच्या किती रिक्त?
- शाखा एकूण जागा प्रवेश रिक्त
- कला ८२०० ३३८२ ४८१८
- वाणिज्य १६०४० ७८११ ८२२९
- विज्ञान २७०३० १९७२२ ७३०८
- एमसीव्हीसी ३२९० १२०४ २०८६