भरडधान्याचे महत्त्व सांगण्याकरिता आदिवासी क्षेत्रातील विनिता पोहचली न्यूयॉर्कमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2023 19:33 IST2023-02-15T19:32:32+5:302023-02-15T19:33:57+5:30
Nagpur News मध्य प्रदेशच्या दिंडाेरी जिल्ह्यातील मेहंदवानी या आदिवासी गावातील विनिता नामदेव व रेखा पंदराम यांना भरडधान्य (मिलेट्स) संवर्धनासाठी केलेल्या सन्मान म्हणून न्यूयॉर्क व शिलाँगमध्ये मिलेट्स परिषदेत बाेलावण्यात आले होते.

भरडधान्याचे महत्त्व सांगण्याकरिता आदिवासी क्षेत्रातील विनिता पोहचली न्यूयॉर्कमध्ये
नागपूर : मध्य प्रदेशच्या दिंडाेरी जिल्ह्यातील मेहंदवानी या आदिवासी गावातील विनिता नामदेव व रेखा पंदराम यांचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पाेहोचले आहे. भरडधान्य (मिलेट्स) संवर्धनासाठी या दाेघींच्या नेतृत्वात झालेल्या कार्याचा सन्मान म्हणून विनिताला २०१७ साली अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये व रेखा यांना २०१८ साली शिलाँगमध्ये मिलेट्स परिषदेत बाेलावले हाेते. त्यांनीही अगदी आत्मविश्वासाने परदेशी नागरिकांना पारंपरिक भरडधान्यातील पाेषणाचे महत्त्व पटवून दिले.
अगदी काही वर्षांपूर्वी सुरू झालेला हा प्रवास आहे. आदिवासींचे पारंपरिक अन्न असलेल्या काेदाे, कुटकीचे धान्य लुप्तप्राय हाेत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या विनिता व रेखा यांनी गावातील १०-१२ महिलांचा बचतगट तयार केला व थाेडे थाेडे पैसे गाेळा करून २०१५ मध्ये अर्धा एकरात काेदाे-कुटकीची शेती सुरू केली. गावातील लाेकांनी खिल्ली उडविली, विराेधही केला; पण त्यांनी ध्येय साेडले नाही. या कार्याला व्यापक रूप देण्यासाठी त्यांनी आसपासच्या गावातील महिलांना जागृत केले. गावात भरणाऱ्या जत्रेत जाऊन भरडधान्य संवर्धनाचे आवाहन केले. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. गावाेगावच्या बचत गटाच्या महिलांनी साथ दिली. विनिता व रेखा यांनी आधी ब्लाॅक व पुढे अनेक गावातील महिलांचा संघ तयार केला. या संघात ४१ गावातील २७५ समूहात ७५०० च्यावर महिला जुळल्या. चमत्कार म्हणजे अर्धा एकरात सुरू झालेली काेदाे-कुटकीची शेती आज १६ हजार हेक्टरवर गेली व यात इतर मिलेट्सचाही समावेश झाला. शेकडाे महिलांना राेजगार मिळाला. विनिता व रेखा यांचे कार्य अमेरिकेपर्यंत पाेहोचले.
या काळात दिंडाेरीचे जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या कार्याला पाठबळ दिले. महिला वित्त विकास विभाग व तेजस्विनी समूहाची स्थापना करीत पायलट प्राेजेक्ट म्हणून अंगणवाड्यांच्या पाेषण आहाराची जबाबदारी या महिला बचत गटांना देण्यात आली. आज जिल्ह्यातील ४०० अंगणवाड्यांपर्यंत या महिला बचत गटांचे पाेषण आहार पाेहोचते. दरराेज काेदाे-कुटकीची बिस्किटे, नमकीन, चिक्की व विद्यार्थ्यांना मिलेट्सची ‘टेक हाेम खिचडी’सुद्धा दिली जात असल्याचे विनिता नामदेव यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना सांगितले. या दाेघींनाही ‘एशियन लाईव्हलीहूड’सह अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.