खापरखेड्यातील कुख्यात गुन्हेगारांच्या टोळीविरुद्ध 'मकोका' अंतर्गत कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 18:46 IST2025-07-05T18:45:15+5:302025-07-05T18:46:08+5:30
पोलिसांचा दणका : आठ जणांना अटक, दोघांचा शोध सुरू

Action under 'MCOCA' against a gang of notorious criminals in Khaparkheda
लोकमत न्यूज नेटवर्क
खापरखेडा : नागपूर ग्रामीण पोलिसांनी खापरखेडा (ता. सावनेर) पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या कुख्यात गुन्हेगारांच्या टोळीतील १० जणांवर मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम-१९९९) अंतर्गत कारवाई केली आहे.
या सर्वांचा अमली पदार्थ विरोधी (एनडीपीएस) गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील आठ गुन्हेगारांना आधीच अटक करण्यात आल्याने ते नागपूर शहरातील मध्यवर्ती कारागृहात असून, दोघे फरार असल्याने त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मकोका लावण्यात आलेल्या गुन्हेगारांमध्ये टोळीचा म्होरक्या आशिष ऊर्फ गुल्लू राजबहादूर वर्मा (वय २५), रोहित देशराज सूर्यवंशी (वय ३२), सूरज ऊर्फ बारीक रमेश वरणकर (वय २५, तिघेही रा. चनकापूर, ता. सावनेर), अभिषेक ऊर्फ छोटू अनिल सिंग (वय २९), गब्बर दत्तू जुमडे (वय ३०), उदयभान गंगासागर चव्हाण (वय ३२), राकेश ऊर्फ सोनू शिवलाल सूर्यवंशी (वय ३०, चौघेही रा. वलनी, ता. सावनेर), विश्वास राहुल सोळंकी (वय २७, रा. पारधी बेडा, तिडंगी, ता. कळमेश्वर), लखनर्सिंग ऊर्फ विजयसिंग दिलीपसिंग सिकलकर भटिया (वय ३५, रा. सिंगनूर, गोगावा, जिल्हा खरगोन, मध्य प्रदेश) व शाहरूख ऊर्फ सारोप रमेश राजपूत (वय २३, रा. चौभीया, ता. मुलताई, जिल्हा बैतूल, मध्य प्रदेश) या १० गुन्हेगारांचा समावेश आहे.
यातील लखनसिंग सिकलकर व राकेश सूर्यवंशी हे दोघे फरार असल्याने पोलिस त्यांच्या मागावर असून, इतर आठ गुन्हेगार नागपूर शहरातील मध्यवर्ती तुरुंगात आहेत. शाहरूख राजपूतला त्याच्या गावातून नुकतीच अटक करण्यात आली असून, त्याचीही तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.
गांजासह माऊझर जप्त
प्राणघातक हल्ला प्रकरणात हवा असलेल्या आरोपी आशिष वर्माला अटक करण्यासाठी पोलिसांनी २७ एप्रिल २०२५ रोजी अभिषेक सिंग याच्या वलनी येथील घरावर धाड टाकली. यात पोलिसांनी आशिष, अभिषेक व गब्बर जुमडे या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून सहा माऊझर, ३६ जिवंत काडतुसे, दोन वापरलेल्या काडतुसांच्या रिकाम्या केस, १ किलो २८ ग्रॅम गांजा, आठ मोबाईल फोन आणि सीमकार्ड असा एकूण २ लाख ७१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला होता. याच गुन्ह्यात पोलिसांच्या विशेष पथकाने नंतर इतर पाच जणांना अटक केली. तेव्हापासून आठही जण तुरुंगातच आहेत.
गंभीर गुन्ह्यांची नोंद
आशिष वर्मा हा या टोळीचा म्होरक्या आहे. त्याने फार कमी काळात वलनी व चनकापूर परिसरात त्याचे गुन्हेगारी साम्राज्य निर्माण केले. आंतरराज्यीय संबंध असलेल्या या टोळीने खापरखेड्यासह इतर भागात त्यांची चांगलीच दहशत निर्माण केली आहे. या टोळीतील सर्व गुन्हेगारांवर संघटितरीत्या अमली पदार्थांची विक्री करणे, हत्या करणे, खुनाचा प्रयत्न करणे, प्राणघातक शस्त्र बाळगणे, अवैधरीत्या अग्निशस्त्रांची व त्याला लागणाऱ्या काडतुसांची विक्री करणे, गैर कायदेशीर मंडळी जमविणे, गंभीर दुखापत पोहोचवून जीवे मारण्याच्या धमक्या देणे, अवैध दारू विक्री करणे अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
जिल्ह्यातील पहिला मकोका खापरखेडा ठाण्यात
नागपूर जिल्ह्यातील पहिली मकोका कारवाई ही खापरखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली आहे. सन २००२ पूर्वी या पोलिस ठाण्याच्या हद्दीत शिवा व मेहनत या दोन गुन्हेगारांची त्यांच्या स्वतंत्र टोळ्या तयार करून त्यांची दहशत निर्माण केली होती. या दोन्ही टोळ्या एकमेकांच्या कट्टर विरोधक होत्या. खापरखेडा येथील देशी दारूच्या दुकानात भांडण झाले आणि दुकान जाळण्यात आले. या प्रकरणात दोन्ही टोळ्यांमधील गुन्हेगारांवर माकोका लावण्यात आला होता. ही नागपूर जिल्ह्यातील मकोकाची पहिलीच कारवाई होती. त्यानंतर सन २०१९ मध्ये याच ठाण्याच्या हद्दीत कुख्यात सूरज कावळे व त्याच्या साथीदारांवर मकोका लावण्यात आला. आशिष वर्मा व त्याच्या साथीदारांवर केलेली कारवाई ही तिसरी होय.