अल्पवयीन बहिणींचे अपहरण करणारा आरोपी जेरबंद; मुली पालकांच्या स्वाधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2022 14:46 IST2022-07-08T14:37:25+5:302022-07-08T14:46:42+5:30
नागपुरात आणून आरोपीला अटक करण्यात आली तर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अल्पवयीन मुलींना त्यांच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले.

अल्पवयीन बहिणींचे अपहरण करणारा आरोपी जेरबंद; मुली पालकांच्या स्वाधीन
नागपूर : परप्रांतात राहणाऱ्या वडिलांना भेटायला जातो, असे सांगून नागपुरातून निघालेल्या दोन अल्पवयीन बहिणींना ओळखीच्या आरोपीने मध्येच उतरवून घेतले. त्या दोघींना त्याने आपल्या मामांकडे नेऊन ठेवले. मात्र, तक्रार मिळताच रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून दोन्ही मुलींसह आरोपीचाही छडा लावला.
मुलींचे वय १४ आणि १६ वर्षे असून त्या कळमन्यातील रहिवासी आहेत. आईवडिलांमध्ये मनभिन्नता असल्याने वडील झारखंडमध्ये, तर आई या दोघींसह नागपुरात राहते. अलीकडे पती - पत्नी आणि बापलेकींमध्ये चांगला संवाद सुरू झाल्याने २५ जूनला या दोघीं वडिलांना भेटण्यासाठी रेल्वेगाडीने निघाल्या. या दोघींना अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसमध्ये बसवून आई घरी निघाली तिकडे छातीत दुखत असल्याचे सांगून गोंदिया स्थानकावर उतरल्या. या दोघींचा निरोप एका तिसऱ्याच व्यक्तीने त्यांच्या मोबाईलवरून मुलींच्या आईला दिला. दरम्यान, दुसऱ्या दिवशी रेल्वेगाडी टाटानगरला पोहोचली. वडील मुलींना घ्यायला स्टेशनवर गेले. मात्र, मुली पोहोचल्याच नाहीत. ही माहिती त्याने पत्नीला दिली. त्यानंतर आईच्या तक्रारीवरून लोहमार्ग पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून हे प्रकरण तपासासाठी नागपूर लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केले.
छातीत दुखण्याचा निरोप देणाऱ्या मुलींनी त्यांचा मोबाईल बंद करून ठेवला होता. तो धागा पकडून पोलिसांनी कॉल लोकेशन्सच्या आधारे शिवनी (मध्य प्रदेश) गाठले. तेथून त्या दोघी, तसेच मोठ्या मुलीचा मित्र अशा तिघांना ताब्यात घेतले. त्यांना नागपुरात आणून आरोपीला अटक करण्यात आली तर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अल्पवयीन मुलींना त्यांच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले.
आधीच ठरले होते
मोठ्या मुलीचा मित्र असलेला आरोपी याने आधीच डोंगरगडला जाण्याची योजना बनविली होती. त्यानुसार, वडिलांना भेटण्याच्या बहाण्याने निघालेच्या मुलींची तो गोंदिया स्थानकावर वाट बघत होता. मुलींना तेथे उतरवून त्याने आपल्या मामांचे गाव शिवनी गाठले. मात्र, पोलिसांनी मुलींसह त्यालाही शोधून नागपुरात आणले. त्याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.