माजी रणजीपटूकडे घरफोडी करणारे आरोपी २४ तासांत गजाआड

By योगेश पांडे | Updated: May 28, 2025 17:38 IST2025-05-28T17:37:38+5:302025-05-28T17:38:18+5:30

Nagpur : गांजाच्या व्यसनातून आरोपींनी मारला डल्ला

Accused of burglarizing former Ranji player's house arrested within 24 hours | माजी रणजीपटूकडे घरफोडी करणारे आरोपी २४ तासांत गजाआड

Accused of burglarizing former Ranji player's house arrested within 24 hours

योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
व्हीसीएचे क्युरेटर व माजी रणजी क्रिकेटपटू प्रवीण हिंगणीकर यांच्या घरी झालेल्या साडेनऊ लाख रुपयांच्या घरफोडीचा उलगडा झाला आहे. गांजाच्या व्यसनातून एका तरुणाने अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने घरफोडी केली होती. धंतोली पोलीस ठाण्याच्या पथकाने गुन्हा दाखल झाल्यावर २४ तासांच्या आत आरोपीला अटक केली.

हिंगणीकर हे विवेकानंदनगर परिसरात राहतात. त्यांचा एक मुलगा भुवनेश्वर तर दुसरा पुण्याला वास्तव्याला आहे. ते दर महिन्यात मुलांना भेटण्यासाठी जातात. २२ मे रोजी ते घराला कुलूप लावून पुण्याला मुलाकडे गेले. २५ मे रोजी त्यांच्या घरी काम करणाऱ्या महिलेला घराचा मागील दरवाजा उघडा दिसला. तिने फोन करून तुम्ही परत आले आहे का अशी विचारणा केली. महिलेने घरात पाहिले असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडले होते. हिंगणीकर यांनी त्यांचे भाचे अनुराग कुलकर्णी यांना घरी पाठविले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. हिंगणीकरदेखील नागपुरात परतले. चोरट्यांनी घराच्या दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला होता व रोख ९५ हजार, घड्याळ व दागिने असा ९.०७ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. हिंगणीकर यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एकूण तीन आरोपी या घरफोडीत सहभागी असल्याची बाब समोर आली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध सुरू केला. शहरातील जवळपास ३५ सीसीटीव्ही तपासल्यानंतर यात विशाल पाटील (कुकडे ले आऊट) हा सहभागी असल्याची माहिती मिळाली. पोलीस त्याच्या घरी पोहोचले, मात्र तो फरार झाला होता. पोलिसांना त्याच्या घरात घरफोडीतील सर्व मुद्देमाल मिळाला. मुद्देमाल घरी ठेवल्यावर विशाल त्याच्या अल्पवयीन साथीदारांसोबत वर्धा येथे एका नातेवाईकाकडे लपून बसला होता. धंतोली पोलीस ठाण्याच्या पथकाने त्याला व त्याच्या एका अल्पवयीन साथीदाराला तेथून ताब्यात घेतले. एक आरोपी अद्यापही फरार आहे. पोलिसांनी साडेनऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे यांनी दिली.

चंद्रपूरमध्येदेखील मारला होता डल्ला
विशालचे वडील एका सरकारी कार्यालयात लिपिक आहेत आणि विशालला गांजा ओढण्याचे व्यसन आहे. पूर्वी ते चंद्रपूरमध्ये राहत होते. विशालने तेथेदेखील पाच चोरी केल्या होत्या. विशालला गांजा ओढण्याच्या व्यसनामुळे त्याचे वडील नागपूरला आले होते. परंतु येथेही विशालने अजनी पोलिस ठाण्याअंतर्गत ड्रग्जसाठी आणखी दोन चोरी केल्या.

Web Title: Accused of burglarizing former Ranji player's house arrested within 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.