रेल्वेसमोर उडी : हत्याकांडाच्या तपासला वेगळे वळण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रेमभंग झालेल्या आरोपीने तरुणीचा लहान भाऊ आणि तिच्या आजीची हत्या केल्यानंतर रात्री स्वतः रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. यामुळे शहरात खळबळ उडवून देणाऱ्या गिट्टीखदानच्या दुहेरी हत्याकांडाला वेगळे वळण मिळाले आहे.
आरोपी केवळ १७ वर्षांचा असून त्याने गुरुवारी दुपारी गिट्टीखदानमधील लक्ष्मी धुर्वे (६७) आणि त्यांचा नातू यश धुर्वे (१०) या दोघांची निर्घृण हत्या केली होती. या हत्याकांडाने शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांची वेगवेगळी पथके आरोपीची शोधाशोध करीत असतानाच रात्रीच्या वेळेस रेल्वे इंजिन ड्रायव्हरने कंट्रोल रूममध्ये फोन करून एकाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची माहिती दिली. त्यानुसार मानकापूर पोलीस तिथे पोचले. ते मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच आरोपीच्या मित्रांनी तो आत्महत्या करीत असल्याची माहिती गिट्टीखदान पोलिसांना दिली. त्यानुसार गिट्टीखदान पोलीसही तेथे पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करून मृताची ओळख पटविली. रेल्वेखाली आत्महत्या करणारा दुहेरी हत्याकांडाचा आरोपीच असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन मेयोत रवाना केला.
चौकशीची औपचारिकता
आरोपीने आत्महत्या केल्याने या दुहेरी हत्याकांडाला वेगळे वळण मिळाले आहे. चौकशीची केवळ कागदोपत्री पूर्तता करणे एवढेच काम पोलिसांसमोर आहे. वृत्त लिहिस्तोवर पोलिसांकडून या प्रकरणाशी जुळलेल्या दुसऱ्या पैलूंची पोलीस चौकशी करीत आहेत.