Accused arrested for blackmailing train tickets in Nagpur | नागपुरात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या आरोपीला अटक

नागपुरात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या आरोपीला अटक

ठळक मुद्देआरपीएफची कारवाई : १५ हजारांची ई-तिकिटे जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वेतिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या आरोपीला रेल्वे सुरक्षा दलाने अटक करून त्याच्याकडून १५ हजार रुपये किमतीची १८ ई-तिकिटे जप्त करण्यात आली आहेत.
रेल्वे सुरक्षा दलाचे गुन्हे शाखेचे निरीक्षक सुधीर कुमार मिश्र, सी. एल. कनोजिया, उपनिरीक्षक आर. के. यादव, मनोज काकड, आनंद करवाडे, अश्विन पवार, अमित बारापात्रे यांनी महालक्ष्मी नेट कॅफे, प्लॉट नं. १५१, विद्यानगर मॉडर्न स्कूल रोड, कोराडी येथे धाड टाकली. उपनिरीक्षक आर. के. यादव यांनी आपली ओळख देऊन दुकानातील व्यक्ती अशोक ढोमणे (२९) रा. प्लॉट नं. १५१ विद्यानगर, मॉडर्न स्कूल रोड, कोराडी याची विचारपूस केली. रेल्वे तिकिटांच्या काळाबाजारीबाबत चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तर दिली. त्यानंतर त्याने तीन वर्षांपूर्वी आपल्याकडे ई-तिकीट काढण्याचा परवाना असल्याची माहिती दिली. त्याचा परवाना संपला होता. त्यानंतर त्याच्याकडून १८ ई-तिकिटांची प्रिंट काढण्यात आली. ही तिकिटे त्याने पर्सनल आयडीवरून काढल्याचे मान्य केले. प्रत्येक ग्राहकाकडून २०० ते ३०० रुपये अधिक घेऊन हे तिकीट देत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच्याकडून ११ लाईव्ह ई-तिकिटे किंमत ९२१५, जुनी ई-तिकिटे किंमत ५७३४, एमआय कंपनीचा मोबाईल ६ हजार, प्रिंटर १० हजार ५०० रुपये, १ मॉनिटर, की बोर्ड, सीपीयू एकूण किंमत रुपये ३९,४४९ असा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरुद्ध रेल्वे अ­ॅक्ट १४३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Accused arrested for blackmailing train tickets in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.