नागपुरातील जरीपटक्यात तोंडाला दुपट्टा बांधलेल्या आरोपींचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 01:07 IST2019-10-05T01:05:47+5:302019-10-05T01:07:04+5:30
बाईकवर स्वार होऊन तोंडाला दुपट्टे बांधलेल्या युवकांनी गुरुवारी रात्री जरीपटका परिसरात दगडफेक करून धुमाकूळ घातला. त्यांनी वाहनांची तोडफोड करून एका युवकाला जखमी केले.

नागपुरातील जरीपटक्यात तोंडाला दुपट्टा बांधलेल्या आरोपींचा धुमाकूळ
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बाईकवर स्वार होऊन तोंडाला दुपट्टे बांधलेल्या युवकांनी गुरुवारी रात्री जरीपटका परिसरात दगडफेक करून धुमाकूळ घातला. त्यांनी वाहनांची तोडफोड करून एका युवकाला जखमी केले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
जरीपटक्यात महालक्ष्मी अपार्टमेंट आहे. रात्री ११ वाजता बाईकवर स्वार सात-आठ तोंडाला दुपट्टा बांधलेले युवक तेथे पोहोचले. ते अपार्टमेंटच्या खाली जर्नी टुर्स अँड ट्रॅव्हल्सच्या कार्यालयावर दगडफेक करु लागले. त्यांनी कार्यालयात लागलेले सीसीटीव्ही कॅमेरा फोडले. कार्यालयाच्या समोर चारचाकी वाहने उभी होती. हल्लेखोरांनी वाहनांवर दगडफेक करून वाहनांच्या काचा फोडल्या. या वेळी या मार्गावरून २६ वर्षीय ओसीन अमर गोदानी जात होते. ओसीन ज्युस पिण्यासाठी जात होते. हल्लेखोरांचे लक्ष त्यांच्यावर गेले. त्यांनी हॉकी स्टीक आणि चाकूने गोदानी यांच्यावर हल्ला केला. घाबरुन गोदानी तेथून पळून गेले. त्यांनी गोदानी यांच्या हातावर हॉकी स्टीकने हल्ला करून त्यांना जखमी केले. हल्लेखोर गोदानी यांचा पाठलाग करून त्यांच्यावर वार करीत होते. ओसीनने अपार्टमेंटमध्ये शिरून आपला जीव वाचविला. तोडफोड करून हल्लेखोर फरार झाले. घटनेची माहिती मिळताच जरीपटका पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी परिसर आणि चौकात लावलेल्या सीसीटीव्हीची तपासणी केली. त्यात हल्लेखोरांचा सुगावा लागला नाही. हल्लेखोरांनी अपार्टमेंटमधील रहिवाशासोबत वैमनस्य असल्यामुळे हा हल्ला केल्याचा संशय आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपींचा सुगावा न लागल्यामुळे ते गल्लीतून आले असल्याचा संशय आहे. त्यामुळे ते स्थानिक रहिवासी असावे असा अंदाज असून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.