काटोल-वरूड मार्गावर अपघातांचे सत्र : ३१४ कोटींचा सिमेंट रस्ता, हमी ५० वर्षे, पण चार वर्षांतच भेगा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 17:18 IST2025-06-09T17:17:17+5:302025-06-09T17:18:43+5:30
Nagpur : कंत्राटदार 'एच. जी. इन्फ्रास्ट्रक्चर'वर कारवाई कधी?

Accident season on Katol-Warud road: Cement road worth 314 crores, 50-year warranty, but cracks within four years!
नितीन नागपुरे
लोकमत न्यूज नेटवर्क
जलालखेडा : सिमेंट रस्ते किमान ५० वर्षे टिकतील असा दावा राज्यकर्ते करतात. मात्र, ४ वर्षातच काटोल-वरूड या सिमेंट रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या भेगांनी राज्यकर्त्याच्या दाव्यांना फोल ठरविले आहे. या रस्त्याचे बांधकाम एच. जी. इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने केले आहे. जवळपास ३१४ कोटी २१ लाख रुपये खर्च करून या रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आहे.
या रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून रस्त्यावर सर्वत्र मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. या रस्त्यावर रोज अपघात होत आहेत. यामुळे कित्येक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. आठ दिवसांपूर्वी एकाच दिवशी जलालखेडा येथे रस्त्यावर पडलेल्या भेंगामुळे तीन अपघात झाले. त्यात तिघांनीही आपला जीव गमावला.
पुलाचे काम कधी होणार ?
पारडसिंगा, भारसिंगी, जलालखेडा येथील नदीच्या पुलाच्या कामाची सुरुवात करण्यात आली होती; परंतु अजूनपर्यंत पूर्ण करण्यात आले नाही. पुलाचे काम पूर्ण न झाल्यामुळे पावसाळ्यात वाहतूकदारांना मोठी अडचण निर्माण होते.
रस्त्याच्या मेंटेनन्सचे झाले तरी काय?
रस्त्याचे काम एच. जी. इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने केले असून रस्त्याच्या मेंटेनन्सचे कामसुद्धा याच कंपनीकडे आहे; परंतु कंपनीकडून या रस्त्याची कसलीही दुरुस्ती केली जात नसल्याचे दिसून येत आहे.
"काटोल ते वरूड रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी एक टीम तयार तयार करण्यात आली आहे. रविवारपासून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे."
- संजीव जगताप, मुख्य कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग राज्य महामार्ग, नागपूर.