अपघात की कंपनीचा निष्काळजीपणा ? विजेच्या खांबावरून खाली पडून कामगाराचा मृत्यु !

By निशांत वानखेडे | Updated: September 23, 2025 19:51 IST2025-09-23T19:51:05+5:302025-09-23T19:51:41+5:30

चक्रधरनगरमध्ये मोठा अपघात : परिसरातील वीज पुरवठा दिवसभर खंडित

Accident or company negligence? Worker dies after falling from electric pole! | अपघात की कंपनीचा निष्काळजीपणा ? विजेच्या खांबावरून खाली पडून कामगाराचा मृत्यु !

Accident or company negligence? Worker dies after falling from electric pole!

नागपूर : दक्षिण नागपूरमधील चक्रधरनगर येथे संजूबा हायस्कूलजवळ विजेच्या खांबावर काम करत असताना ठेकेदाराच्या कर्मचाऱ्याचा कोसळून मृत्यू झाला. सकाळपासून या भागात देखभाल दुरुस्तीचे काम सुरू असताना दुपारी २ वाजता हा अपघात घडल्याने माेठीच खळबळ उडाली. त्यामुळे या परिसरातील अनेक वस्त्यांमध्ये दिवसभर वीज पुरवठा खंडित राहिला हाेता.

मिळालेल्या माहितीनुसार महावितरणने मंगळवारी चक्रधरनगर, अयोध्यानगर आणि आजूबाजूच्या परिसरात देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी १०.३० वाजतापासून वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला हाेता. त्याची सुचनाही नागरिकांना देण्यात आली हाेती. दरम्यान दुपारी सुमारे २ वाजता ए. डी. इंटरप्रायझेस या ठेकेदार कंपनीचे कर्मचारी झामसिंह उइके आपल्या 'भुरे' नावाच्या सहकाऱ्यासोबत संजूबा हायस्कूलजवळील भीष्म अपार्टमेंटच्या विजेच्या खांबावर जंपर बसवत होते. सुरक्षा म्हणून झुल्याचा वापर करण्यात आला होता.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अचानक झामसिंह यांचा तोल गेला आणि ते झुल्यासह खाली कोसळले. झुल्याचा कील त्यांच्या डोक्यावर आदळला. उपकार्यकारी अभियंता सुनील जैन यांनी सांगितले की, जखमी अवस्थेत त्यांना तातडीने मेडिकल कॉलेज रुग्णालयात नेण्यात आले, पण तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सक्करदरा पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आला आहे. सध्या ही घटना अपघात आहे की निष्काळजीपणामुळे घडली, याचीही चौकशी सुरू आहे.

साडेसहा तासानंतर सायंकाळी ५ वाजता सुरू झाली वीज

दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी १०.३० वाजतापासून वीज पुरवठा बंद करण्यात आला हाेता. मात्र २ वाजता हा अपघात टडल्यानंतर घटनेची माहिती तात्काळ इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर यांना देण्यात आली. त्यांच्या टीमने संपूर्ण परिसरातील वीज तारांची पाहणी केली. तपास केल्यानंतर टीमकडून परवानगी मिळाल्यानंतर संध्याकाळी ५ वाजता विजेचा पुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला. यादरम्यान, परिसरातील सुमारे १५०० ग्राहकांना सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत विजेविना राहावे लागले. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.

Web Title: Accident or company negligence? Worker dies after falling from electric pole!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.