Corona Virus; म्युटेशन झालेल्या विषाणूमुळे ७० टक्के रुग्ण गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 10:41 AM2021-06-11T10:41:49+5:302021-06-11T10:44:27+5:30

Nagpur News राज्यात सर्वच ठिकाणी पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिक तीव्र व धोकादायक ठरली. पहिल्या लाटेत हजार ते दोन हजार दरम्यान दिसून येणाऱ्या रुग्णांची संख्या दुसऱ्या लाटेत चार ते आठ हजार दरम्यान गेली.

About 70% of patients are critically ill with mutated viruses | Corona Virus; म्युटेशन झालेल्या विषाणूमुळे ७० टक्के रुग्ण गंभीर

Corona Virus; म्युटेशन झालेल्या विषाणूमुळे ७० टक्के रुग्ण गंभीर

Next
ठळक मुद्देमेडिकलने दिली कोरोनाच्या मृत्यूची कारणे ५३.७ टक्के रुग्णांचे शरीरातील ऑक्सिजन प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा कमी होते

सुमेध वाघमारे

 लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जनुकीय बदल (म्युटेशन) झालेल्या ‘बी.१.६.१७’ या कोरोना विषाणूचा जवळपास ७० टक्के रुग्णांना गंभीर संसर्ग झाल्याने मृत्यूची संख्या वाढल्याचे कारण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) पुढे केले आहे. या शिवाय, कोरोना रुग्णांना अत्यावश्यक सोयी देण्यास कमी पडलेली महानगरपालिका व आरोग्य विभाग, ग्रामीण व इतर भागातून उपचारासाठी उशिरा आलेले रुग्ण, यात ५३.७ टक्के रुग्णांच्या शरीरातील ९० टक्क्यांपेक्षा कमी असलेली ऑक्सिजनची पातळी, औषधांचा तुटवडा आदी कारणेही दिली आहेत.

राज्यात सर्वच ठिकाणी पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिक तीव्र व धोकादायक ठरली. पहिल्या लाटेत हजार ते दोन हजार दरम्यान दिसून येणाऱ्या रुग्णांची संख्या दुसऱ्या लाटेत चार ते आठ हजार दरम्यान गेली. दैनंदिन मृत्यूचे प्रमाणही ५० ते १००च्या दरम्यान होते. विशेष म्हणजे, जुलै ते सप्टेंबर २०२० या कोरोनाचा पहिल्या लाटेत शासकीयसह खासगी रुग्णालयात २३४५८ रुग्णांपैकी २६४१ (११.२६टक्के) तर, एप्रिल ते मे २०२१ या दुसऱ्या लाटेत ३७२३४ रुग्णांपैकी ७३११ (१९.६४ टक्के ) रुग्णांचे जीव गेले. या मागे ‘म्युटेशन’ झालेला घातक विषाणू व इतरही कारणे असल्याचे मेडिकलने स्पष्ट केले आहे.

-मेडिकलमध्ये दुसऱ्या लाटेत २४७२ रुग्णांचा मृत्यू

मेडिकलमध्ये जानेवारी ते ३१ मे २०२१ या दरम्यान ६३४७ कोरोनाचे गंभीर रुग्ण भरती झाले. यातील २४७२ रुग्णांचा मृत्यू झाला. यातील केवळ ११ टक्के रुग्णांचा शरीरातील ऑक्सिजनची पातळी सामान्य होती. उर्वरीत रुग्णांची पातळी धोकादायक स्थितीत होती. शिवाय, ३६८ (१५ टक्के) रुग्ण म्हणजे मृतावस्थेत दाखल झाले. ४६९ रुग्ण (१९ टक्के ) गंभीर होऊन आल्याने त्यांचा २४ तासाच्या आतच मृत्यू झाला.

-रुग्ण गंभीर होऊन येणाऱ्यांची संख्या मोठी

मेडिकल हे ‘टर्शरी केअर सेंटर’ आहे. यामुळे शहरातील खासगीसह ग्रामीण भागातील रुग्णालयात कोरोनाचा रुग्ण गंभीर झाल्यास त्याला मेडिकलमध्ये पाठविण्याचे प्रमाण मोठे आहे. यामुळेही मृत्यूची संख्या वाढल्याचे मेडिकलचे म्हणणे आहे. दुसऱ्या लाटेत बाहेरगावावरून आलेल्या १३.८ टक्के म्हणजे, ३३९ रुग्णांचा मृत्यू झाला. इतर शासकीय व खासगी रुग्णालयातून आलेल्या ५.० टक्के म्हणजे, १२४ रुग्णांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, खासगी रुग्णालयात गंभीर रुग्णांना भरती करून घेतले जात नसल्याचेही एक कारण आहे.

-ग्रामीण भागात व्हेंटिलेटरचा एकही बेड नाही

पहिल्या लाटेत सुरुवातीला कोविड केअर सेंटर नसल्याने लक्षणे नसलेल्या रुग्णांनाही मेडिकलमध्ये भरती केले जात होते. यामुळे मेडिकलमध्ये मृत्यूचा दर ११.२६ टक्के होता. परंतु दुसऱ्या लाटेत विशेषत: ग्रामीण भागात ‘व्हेंटिलेटर’बेडची सोय उपलब्ध करून देण्यात आली नाही. यामुळे मृत्यूचा दर वाढून १९.६४ टक्क्यांवर गेल्याचे कारण मेडिकलने दिले आहे.

 

Web Title: About 70% of patients are critically ill with mutated viruses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.