नागपुराच्या वानाडोंगरीतील युवकाचे उधारीच्या वसुलीसाठी अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 20:29 IST2017-12-05T20:24:32+5:302017-12-05T20:29:57+5:30
उधार दिलेले पैसे परत न केल्यामुळे सावकाराने आपल्या साथीदाराच्या मदतीने एका युवकाचे अपहरण करून त्याला मारपीट केली. एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत ही घटना घडली असून, आठवडाभरानंतर ती उजेडात आली.

नागपुराच्या वानाडोंगरीतील युवकाचे उधारीच्या वसुलीसाठी अपहरण
आॅनलाईन लोकमत
नागपूर : उधार दिलेले पैसे परत न केल्यामुळे सावकाराने आपल्या साथीदाराच्या मदतीने एका युवकाचे अपहरण करून त्याला मारपीट केली. एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत ही घटना घडली असून, आठवडाभरानंतर ती उजेडात आली. तक्रारकर्ता वानाडोंगरी येथील ३२ वर्षीय विजय शंभूनाथ बंड आहे. विजय हा दारूच्या दुकानात काम करीत होता. पोलिसांच्या सांगण्यानुसार विजयने दोन वर्षापूवी वायसीसी कॉलेज जवळ राहणाºया आकाश बंडू झाडे याच्याकडून १ लाख रुपये ४० टक्के व्याजाने उधार घेतले होते. विजयने काही महिन्यातच उधारीचे पैसे व्याजासह परत केले. त्यानंतर पुन्हा झाडे याच्याकडून ३ लाख रुपये उधार घेतले. या उधारीवरून त्यांच्यात वाद सुरू होता.
झाडे हा विजय याला मूळ राशीसह ४० टक्के व्याज देण्याची मागणी करीत होता. परंतु विजयकडून देण्यास उशीर होत असल्याने, झाडे संतप्त झाला होता. २६ नोव्हेंबरच्या दुपारी आकाश झाडे, संगीता जाधव, रामराव आवळे, बबिता खंडारे व सूरज नावाची व्यक्ती विजयकडे आले. विजयने काही रक्कम परतही केली. त्याने ४० टक्के व्याज भरपूर झाल्याचे सांगून काही दिवसांची मुदत मागितली. आरोपी त्यासाठी तयार नव्हते. त्यांनी विजयला मारपीट केली. आरोपींनी त्याला मारहाण करून, त्याला जबरदस्तीने दुचाकीवर बसविले. वानाडोंगरी परिसरात नेऊन जोरदार मारपीट केली. पैसे परत न केल्यास जीवाने मारण्याची धमकीही दिली.
या घटनेमुळे घाबरलेल्या विजयने पोलिसात देखील तक्रार केली नाही. मारपीट केल्यानंतरही आरोपी त्याला फोनवरून धमकावत होते. त्यामुळे त्याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अपहरण, मारपीट व महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ अन्वये गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करून २४ तास झाल्यानंतरही पोलिसांना आरोपीचा पत्ता लागला नाही. एमआयडीसी पोलीस प्रकरणाची माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहे. तपास अधिकारी पीएसआय जाधव यांना बरेच प्रयत्न केल्यानंतरही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. या प्रकरणी जाधव यांचा भूमिका संदिग्ध असल्याचे सांगण्यात येते. पोलीस निरीक्षक सुनील महाडीक हे बैठकीत व्यस्त असल्याने घटनेची माहिती देऊ शकले नाही. ठाण्यातील उपस्थित पोलीस कर्मचाºयांनाही घटनेची विस्तृत माहिती नव्हती.