बॅंकेत चोरी करणाऱ्या तरुणीला रंगेहाथ अटक
By योगेश पांडे | Updated: July 1, 2023 14:10 IST2023-07-01T14:06:26+5:302023-07-01T14:10:55+5:30
बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

बॅंकेत चोरी करणाऱ्या तरुणीला रंगेहाथ अटक
नागपूर : बॅंकेत चोरी करणाऱ्या एका तरुणीला रंगेहाथ अटक करण्यात आली. महिलेने एका व्यक्तीच्या बॅगला चिरा मारत पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मध्यप्रदेशातील पिंकी विजय सिसोदिया (२०, करिया, राजगढ) या तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
राजेश राजन चाक्कल (५८, संताजी सोसायटी, बेलतरोडी) हे नायर कंपनीत कार्यरत आहेत. कंपनीचे सदर येथील किंग्जवेतील पंजाब नॅशनल बॅंकेत खाते आहे. शुक्रवारी राजेश दुपारी सव्वाबारा वाजताच्या सुमारास कंपनीचे पैसे काढण्यासाठी बॅंकेत गेले होते. दोन लाख रुपये काढून त्यांनी पैसे स्वत:जवळील बॅगमध्ये ठेवले होते. पिंकी त्यावेळी त्यांच्या मागे उभी होती व तिने ब्लेडने बॅगेला चिरा मारत पैसे काढण्याचा प्रयत्न केला.
नेमका हा प्रकार तेथे उभ्या असलेल्या एका व्यक्तीला व कर्मचाऱ्याला दिसला. त्यांनी बॅंकेतील इतर महिलांच्या मदतीने तिला ताब्यात घेतले व पोलिसांना माहिती दिली. सदर पोलीस ठाण्याचे पथक बॅंकेत पोहोचले व तिला अटक केली. तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.