नागपूर : शहरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कपिल नगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यावर २३ वर्षीय तरुणीने लैंगिक छळाचा गंभीर आरोप केला आहे. पीडितेच्या मते, संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केली आणि वारंवार लैंगिक छळ केला.
आरोपी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव उमेश शेळके असे असून तो सध्या फरार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पीडित तरुणीने तीन आठवड्यांपूर्वी या प्रकरणाची तक्रार दाखल केली होती; मात्र तक्रार दाखल होऊनही आरोपीविरुद्ध कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा गंभीर आरोप पीडितेने केला आहे.
पीडितेने माध्यमांशी बोलताना सांगितले की, “मी न्यायासाठी पोलिसांकडे गेले, पण माझीच मानसिक छळवणूक केली गेली. आरोपीविरुद्ध काहीच कारवाई होत नाहीये,” असे ती म्हणाली. या प्रकरणामुळे नागपूर पोलिस दलातील विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी उमेश शेळकेचा शोध सुरू आहे आणि त्याला लवकरच अटक केली जाईल. मात्र घटनेनंतर तीन आठवडे उलटूनही तो फरार असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे, हा आरोप अशा व्यक्तीवर आहे ज्याचं कामच नागरिकांचं संरक्षण करणं आहे. सामाजिक संस्थांकडून आणि महिला हक्क संघटनांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे.