दुचाकीवरून जाताना केबल गळ्यात अडकून तरुण ठार
By योगेश पांडे | Updated: July 11, 2023 17:35 IST2023-07-11T17:34:38+5:302023-07-11T17:35:28+5:30
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

दुचाकीवरून जाताना केबल गळ्यात अडकून तरुण ठार
नागपूर : रस्त्यावरून जात असताना केबलचा वायर गळ्यात अडकून खाली पडल्याने एका मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
गजानन पंजाबराव रंगारी (३३, आंबेडकरनगर, कंट्रोल वाडी) असे मृतकाचे नाव आहे. ६ जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास ते वाडी ते हिंगणा टी पॉईन्ट या मार्गावरून रोशन ठवकर या मित्रासोबत मोटारसायकलने जात होते. अचानक अमेरिकन हॉस्पिटलजवळ रस्त्यावर आडवा असलेला केबलचा वायर दोघांच्याही गळ्यात अडकला. त्यामुळे ते दोघेही खाली पडले. यात गजानन यांच्या डोक्याला गंभीर मार लागला व ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते.
प्रकृती खालावल्याने त्यांना ८ जुलै रोजी मेडिकल इस्पितळात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान सोमवारी त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून कुणाच्या बेजबाबदारपणामुळे केबलचा वायर लटकला होता, याचा तपास सुरू आहे.