मजुराच्या नावे खाते उघडून केला दोन कोटींचा व्यवहार; एकाला अटक, एक फरार
By दयानंद पाईकराव | Updated: October 7, 2023 16:27 IST2023-10-07T16:26:41+5:302023-10-07T16:27:43+5:30
दोन भावांनी गंडविले

मजुराच्या नावे खाते उघडून केला दोन कोटींचा व्यवहार; एकाला अटक, एक फरार
नागपूर : बॅंकेत खाते उघडल्यास दर महिन्याला दहा हजार रुपये मिळण्याची स्कीम सुरु आहे, अशी एका मजुराला बतावणी करून त्याचे चार बॅंकेत खाते उघडून दोन भावांनी मिळून त्या खात्यात दोन कोटी रुपयांचा व्यवहार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी एका भावाला अटक केली असून एक भाऊ फरार झाला आहे.
बबलूू राजकुमार जाधव (वय २८) आणि निखील जाधव (वय २६) दोघे. रा. काच कंपनीजवळ, मानव मंदिरासमोर, कपिलनगर अशी आरोपी भावांची नावे आहेत. पोलिसांनी आरोपी बबलूला अटक केली आहे. त्याचा भाऊ निखील फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. मोहन मारोती दोडेवार (वय २५, रा. समर्थनगर उप्पलवाडी, कपिलनगर) ह. मु. कुशीनगर जरीपटका हे मजुरीचे काम करतात. आरोपी दोन्ही भावांनी मोहन यांच्याशी असलेल्या ओळखीचा फायदा घेऊन त्यांना बॅंकेत स्कीम सुरु असून खाते उघडल्यास दर महिन्याला दहा हजार रुपये मिळतील अशी बतावणी केली.
आरोपींनी मोहनच्या नावावर एचडीएफसी बॅंक, टेकानाका शाखा, कॅनरा बॅंक, जरीपटका शाखा, आयसीआयसीआय बॅंक, जाफरनगर शाखा आणि ईंसाफ बॅंक, पाटनकर चौक शाखा येथे खाते उघडले. आरोपींनी एचडीएफसी बॅंक व कॅनरा बॅकेच्या खात्यामध्ये मोहनच्या नावाने दोन कोटी रुपयांच्या वर व्यवहार करून त्याची फसवणूक केली. मोहनने दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ४०६. ४२०, ३४ नुसार गुन्हा दाखल करून आरोपी बबलूला अटक केली आहे. बबलूचा भाऊ निखील फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.