जंगल सफारीच्या पहिल्याच दिवशी वाघांची डरकाळी; पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटकांनी घेतला आनंद
By निशांत वानखेडे | Updated: October 1, 2024 16:04 IST2024-10-01T16:01:48+5:302024-10-01T16:04:37+5:30
७० जीप्सी जंगल सफारीसाठी : ५० पेक्षा अधिक प्रौढ वाघांचे वास्तव्य

A tiger scare on the first day of a jungle safari; Tourists enjoy Pench Tiger Reserve
नागपूर/देवलापार
नागपूर : पावसाळ्यानंतर १ ऑक्टाेबरपासून नागपूर विभागातील सर्व अभयारण्यात सफारी सुरू केल्यानंतर मंगळवारी पहिल्याच दिवशी पर्यटकांनी जंगल सफारीचा मनमुराद आनंद लुटला. अतिवृष्टीची परिस्थिती लक्षात घेता पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या काही गेटवरून पर्यटन सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी सफारीसाठी पर्यटकांची माेठी गर्दी पाहायला मिळाली. रामटेक तालुक्यातील सिल्लारी गेटकडून सफारीला गेलेल्या काही पर्यटकांना टी-६२ वाघीण व तिच्या तीन बछड्यांचे मनमाेहक दर्शनही झाले.
टी-६२ वाघीण तिच्या बछड्यांसह फेफाडीकुंड रस्त्यावर फिरत असताना काही पर्यटकांनी माेबाईल कॅमेरात कैद केलेले तिचे फाेटाे ‘लाेकमत’कडे पाठविले. अतिवृष्टीमुळे रस्त्याची परिस्थिती लक्षात घेता सद्य:स्थितीत पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या सिल्लारी गेट, खुर्सापार गेट, बनेरा गेट व चाेरबाहुली गेटवरून सफारीसाठी परवानगी देण्यात आली आहे. सध्या जंगल सफारी करणाऱ्यांना १५ ऑक्टोंबरपर्यंत ऑफलाइन पद्धतीने बुकींग करावी लागणार आहे. १६ ऑक्टाेबरनंतर ऑनलाईन बुकिंग सुरू हाेईल.
बफर क्षेत्रात राहते टायरगरची मुव्हमेंट
१९७५ मध्ये व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळालेल्या सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पाचा कोअर झोन ४३९.८४ कि.मी. तर बफर झोन २०५.०३ कि.मी. इतका आहे. या व्याघ्र प्रकल्पात सुमारे ५५ पेक्षा अधिक प्रौढ वाघांचे वास्तव्य आहे. या व्याघ्र प्रकल्पाचे कोअर क्षेत्र वाघ, बिबट, अस्वल आदी वन्य जीवांच्या संवर्धनासाठी उपयुक्त ठरत असून; पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातही वाघांची मुव्हमेंट असते.
"पेंच व्याघ्र प्रकल्पात मंगळवारपासून जंगल सफारी सुरू झाली. येथे पहिल्या दिवसापासूनच ऑनलाइन बुकींग सुरू झालेली आहे. पहिल्या दिवशी माेठ्या संख्येने पर्यटकांनी हजेरी लावली. सफारीकरीता आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत."
-विवेक राजुरकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, पेंच व्याघ्र प्रकल्प, सिल्लारी.