९० अंश वाकलेला कणा... पण मनोबल होतं सरळ : ‘पुष्पा’ पुन्हा उभी राहिली!
By सुमेध वाघमार | Updated: July 4, 2025 18:52 IST2025-07-04T18:52:18+5:302025-07-04T18:52:57+5:30
गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी : १२ वर्षांची मुलगी पुन्हा सरळ उभी!

A spine bent 90 degrees... but the morale was straight: 'Pushpa' stood up again!
नागपूर : 'पुष्पा' चित्रपटातील 'झुकेगा नही...' हा प्रसिद्ध डायलॉग एका १२ वर्षांच्या मुलीने आपल्या आयुष्यात खरा करून दाखवला आहे. पाठीच्या टीबीमुळे तिचा कणा वाकडा झाला होता आणि ती वाकून चालण्यास मजबूर होती. त्यातच तिचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असल्याने मोठ्या खासगी रुग्णालयात उपचार करणे त्यांच्या आवाक्याबाहेर होते. परंतु 'एक ना एक दिवस मी पुन्हा सरळ उभी राहीन' या तिच्या जिद्दीला एका निमशासकीय रुग्णालयाने आणि तेथील डॉक्टरांनी मदतीचा हात दिला. अत्यंत गुंतागुंतीची आणि जीवघेणी शस्त्रक्रिया यशस्वी करून, त्यांनी तिला पुन्हा एकदा सरळ उभे केले आणि जीवनाची नवी उमेद दिली.
'पुष्पा' (नाव बदललेले) या १२ वर्षीय मुलीला काही दिवसांपासून तीव्र पाठदुखीचा त्रास होता. स्थानिक डॉक्टरांकडून उपचार घेत असतानाही तिच्या आजाराचे निदान होऊ शकले नाही, परिणामी तिची प्रकृती बिघडतच गेली. ती पुढे वाकून चालू लागली, नीट बसता किंवा उभेही राहता येत नव्हते, वजन खूप कमी झाले होते आणि पाठीवर एक मोठा उंचवटा निर्माण झाला होता. या अवस्थेला 'गिब्बस डिफॉर्मिटी' असे म्हणतात. यामुळे ती कायमस्वरूपी अपंग होण्याचा आणि मूत्र व मलाशयावरील ताबा जाण्याचा धोका होता. शेवटचा पर्याय म्हणून 'पुष्पा' शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, वानाडोंगरी येथील बालरोग विभागात दाखल झाली. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर तिला पाठीला टीबी असल्याचे आणि त्यामुळे गंभीर वाकडेपणा (कायफोस्कोलियोटिक डिफॉर्मिटी) असल्याचे निदान केले.
९० अंशाचा वाकलेला कणा, ६ तासांची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया
ब्रेन आणि स्पाइन सर्जन आणि असोसिएट प्रोफेसर डॉ. परेश कोरडे यांनी सांगितले की, टीबीमुळे तिच्या दोन मणक्यांमधील भागाचे पूर्णपणे नुकसान झाले होते, ज्यामुळे पाठीला तब्बल ९० अंशाने वाकडेपणा आला होता. यावर शस्त्रक्रिया हाच एकमेव पर्याय होता. तब्बल ६ तास चाललेली ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया डॉक्टरांनी आपल्या अनुभव आणि कौशल्याच्या बळावर यशस्वी केली. डॉक्टरांच्या चमूने रॉड्स, स्क्रू आणि मेटल केजच्या मदतीने मुलीचा वाकलेला पाठीचा कणा सरळ करून स्थिर केला. तिचे मणके लहान आणि नाजूक असतानाही, डॉक्टरांनी तिचा कणा योग्य रचनेत आणला.
वाकलेल्या कणामुळे भूल देणे कठीण
अॅनेस्थेशिया विभागाच्या असोसिएट प्रोफेसर डॉ. प्राची कोरडे यांनी भूल देण्याची प्रक्रिया अतिशय कौशल्याने हाताळली. त्यांनी सांगितले की, मुलीचा पाठीचा कणा खूप वाकलेला असल्यामुळे भूल देणे आणि शस्त्रक्रियेसाठी योग्य पद्धतीने ठेवणे हे खूप कठीण होते. पण अचूक नियोजन आणि अनुभवाच्या जोरावर हे आव्हान सुरक्षितपणे पार करण्यात आले.
शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात यांचा मोलाचा वाटा
शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी विविध विभागांतील तज्ज्ञाचा मोलाचा वाटा राहिला. यात डॉ. फिलिप्स अब्राहम, डॉ. प्रतिभा देशमुख, डॉ. अंजली बोरकर, डॉ. प्रियांका टिकैत, डॉ. राजीव सोनारकर, डॉ. सी. बोकाडे, डॉ. गौरव शर्मा, डॉ. इंद्रजा रॉय, डॉ. शुभम गुप्ता आणि नर्सिंग टीम आदींचा समावेश होता. हॉस्पिटलचे संचालक डॉ. अनुप मरार व ‘सीएमएस’ डॉ. वसंत गावंडे यांनी डॉक्टरांच्या परिश्रमाचे कौतुक केले.