महिलेच्या भरधाव मोपेडच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
By दयानंद पाईकराव | Updated: August 5, 2023 16:14 IST2023-08-05T16:11:20+5:302023-08-05T16:14:19+5:30
अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना

महिलेच्या भरधाव मोपेडच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
नागपूर : महिलेने भरधाव ईलेक्ट्रीक मोपेडने धडक दिल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी ३१ जुलैला दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली.
कृष्णराव श्रीराम लोखंडे (वय ७६, रा. प्लॉट नं. २९, गिट्टीखदान ले आऊट, प्रतापनगर) असे या अपघातात मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. ते अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजी स्केटींग क्लब जवळील चौक गांधीनगर येथून गांधीनगर येथील त्यांच्या दुकानाकडे स्कुटी क्रमांक एम. एच. ३१ बी. झेड-४२६० ने जात होते. तेवढ्यात आरोपी ईलेक्ट्रीक चेतक मोपेड क्रमांक एम. एच. ३१, एफ. व्ही-५९७९ च्या महिला चालकाने तिच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून त्यांना धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले.
त्यांना उपचारासाठी हिलटॉप येथील खासगी रुग्णालयात व तेथून मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. परंतू उपचारादरम्यान ४ ऑगस्टला रात्री १०.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी त्यांचा मुलगा शशांक लोखंडे वय ३३) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी मोपेड चालक महिलेविरुद्ध कलम २७९, ३३८, ३०४ (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे.