पॅरोलवर आलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2023 20:09 IST2023-05-13T20:08:30+5:302023-05-13T20:09:10+5:30

Nagpur News प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील त्रिमूर्ती अपार्टमेंटच्या दुसऱ्या माळ्यावर एका इसमाने स्वत:च्या पत्नीवर धारदार चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले.

A paroled husband assaulted his wife | पॅरोलवर आलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला

पॅरोलवर आलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला

नागपूर : प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील त्रिमूर्ती अपार्टमेंटच्या दुसऱ्या माळ्यावर एका इसमाने स्वत:च्या पत्नीवर धारदार चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले. आरोपी इसम हा तिचा पती असल्याची माहिती आहे. तो नुकताच पॅरोलवर सुटून आला होता.

ही घटना शुक्रवार १२ मे रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. जखमी झालेल्या महिलेचे नाव सुचिता सुमित पुरी आहे. आरोपींमध्ये तुमसर येथील सुमित गुलाब पुरी (३५) व त्याचा साथीदार हर्षल सुनील सोरदे (२७ रा. गिट्टीखदान) याचा समावेश आहे. तुमसर तालुक्यातील चुल्हाड येथे राहणारा सुमित पुरी खुनाच्या गुन्ह्यात २०१५ पासून भंडारा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. कारागृहात राहून तो पत्नी सुचिता हिच्या चरित्र्यावर संशय घेऊन पत्राच्या माध्यमातून तिला मारण्याची धमकी देत होता.

दरम्यान, सुमितला २७ एप्रिल २०२३ रोजी कारागृहातून २१ दिवसांची पॅरोल मिळाली. शुक्रवारी सकाळी सुमित हा मित्र हर्षलसोबत त्रिमूर्ती अपार्टमेंटच्या दुसऱ्या माळ्यावर पोहचला. तिथे त्याने सुचितासोबत वाद घातला. त्याने चाकूने सुचिताच्या हात, पाठ व डोक्यावर वार करीत जिवाने मारण्याचा प्रयत्न केला. सुमित तिला गंभीररीत्या जखमी करून फरार झाला. जखमी सुचिताचा एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. पीडितेच्या बयाणानुसार प्रतापनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. दुसरा आरोपी हर्षल याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, मुख्य आरोपी सुमितचा शोध सुरू आहे.

Web Title: A paroled husband assaulted his wife