आईवडिलांना ठार मारण्याची धमकी देत नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार
By योगेश पांडे | Updated: April 29, 2024 17:58 IST2024-04-29T17:55:11+5:302024-04-29T17:58:29+5:30
Nagpur : दोन दिवसांअगोदर सात वर्षीय मैत्रीणीसोबतदेखील अत्याचार

A nine-year-old girl was assaulted by threatening to kill her parents
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आईवडिलांना ठार मारण्याची धमकी देत परिचयातीलच एका व्यक्तीने नऊ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला. बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
दिनेश प्रताप किल्लारे (३०, बजाजनगर) असे आरोपीचे नाव आहे. रविवारी त्याच्या परिचयातील एक दांपत्य कामावर गेले होते. त्यांची नऊ वर्षीय मुलगी घरी होती. दिनेश त्यांच्या घरी गेला व मुलीला गोड बोलून एका खोलीत घेऊन गेला. तेथे त्याने तिच्याशी अश्लिल कृत्य करण्यास सुरुवात केली. यामुळे घाबरलेल्या मुलीने ओरडण्यास सुरुवात केली. यावरून आरोपीने तुझ्या आईवडिलांना ठार मारेन व तुला काहीच खाऊ देणार नाही अशी धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. कुणालाही काहीच न सांगण्याचीदेखील त्याने धमकी दिली. या घटनेमुळे हादरलेल्या मुलीने पालक घरी आल्यावर त्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यावेळी तिची सात वर्षांची मैत्रीणदेखील तिथे होती. तिने दोन दिवसांअगोदर तिच्यासोबतदेखील असाच प्रकार घडल्याचे सांगितले. यावरून पालकांच्या पायाखालची जमीनच निसटली. त्यांनी बजाजनगर पोलीस ठाणे गाठून दिनेशविरोधात तक्रार केली. पोलिसांनी दिनेशविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.