संघाच्या तपस्येतून विकसित भारताचा नवा अध्याय, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 06:56 IST2025-03-31T06:55:38+5:302025-03-31T06:56:39+5:30

Narendra Modi In RSS Headquarters: संघटन, समर्पण आणि सेवेची त्रिवेणी हेच भारत देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी महत्त्वाचे सूत्र ठरणार आहे. देशाला ही सूत्रे देणाऱ्या संघाच्या तपस्येतूनच विकसित भारताचा नवीन अध्याय लिहिला जात आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

A new chapter of India developed through the penance of the RSS, Prime Minister Narendra Modi's statement | संघाच्या तपस्येतून विकसित भारताचा नवा अध्याय, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विधान

संघाच्या तपस्येतून विकसित भारताचा नवा अध्याय, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विधान

नागपूर  - २०४७ साली स्वातंत्र्याची शंभर वर्षे पूर्ण करत असताना विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यावर सर्वांचा भर राहणार आहे. संघटन, समर्पण आणि सेवेची त्रिवेणी हेच भारत देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी महत्त्वाचे सूत्र ठरणार आहे. देशाला ही सूत्रे देणाऱ्या संघाच्या तपस्येतूनच विकसित भारताचा नवीन अध्याय लिहिला जात आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. रविवारी नागपुरात माधव नेत्रालयाच्या प्रीमियम सेंटरच्या भूमिपूजनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
पंतप्रधान मोदी यांनी साडे चार तासांच्या दौऱ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसर तसेच दीक्षाभूमीलादेखील भेट दिली. सोलर एक्स्प्लोसिव्हमध्ये टेस्ट रेंज, रनवेचे उद्घाटनही त्यांनी केले.

माधव नेत्रालयाच्या कार्यक्रमाला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, स्वामी अवधेशानंदगिरी महाराज, स्वामी गोविंददेवगिरी महाराज, माधव नेत्रालय चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष निखिल मुंडले, महासचिव डॉ. अविनाशचंद्र अग्निहोत्री हे उपस्थित होते. 

संघाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले...
कोणत्याही देशाचे अस्तित्व हे त्या देशातील पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या त्याच्या संस्कृतीच्या विस्तारावर अवलंबित असते.
आपल्यावर एवढे परकीय हल्ले झाले, आपली संस्कृती नष्ट करण्याचे प्रयत्न झाले, तरी भारतीय संस्कृतीची चेतना मिटली नाही.
कारण ही चेतना जागृत ठेवणारी अनेक आंदोलने भारतात होत राहिली आहेत. शंभर वर्षाअगोदर राष्ट्रीय चेतनेच्या बीजाचा आज वटवृक्ष झाला आहे.
संघ भारताच्या संस्कृतीचा कधीही न मिटणारा अक्षयवट आहे. संघ हा देशहितासाठी बाह्य व आंतरिक दृष्टी चेतना जागृत करणारा यज्ञ आहे.

आरोग्य सुविधांबाबत पंतप्रधान म्हणाले...
गरिबातील गरिबाला सर्वोत्तम उपचार देण्यावर केंद्र सरकारचा भर आहे. मातृभाषेत वैद्यकीय शिक्षण देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे, ज्यामुळे वंचित समाजातील मुलेदेखील वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू शकतील.
आयुष्मान भारत योजनेमुळे कोट्यवधी लोकांना मोफत उपचार मिळत आहेत. यामुळे जनतेचे हजारो कोटी रुपये वाचत आहेत.

माधव नेत्रालय महत्त्वाची संस्था ठरेल : मुख्यमंत्री
दृष्टी ही ईश्वराने मानवाला दिलेला मौल्यवान ठेवा आहे. ज्यांच्याकडे दुर्दैवाने ही दृष्टी नाही त्यांच्या जीवनात प्रकाश आणण्याचे कार्य माधव नेत्रालय गत तीन दशकांपासून करत आहे. नेत्र आरोग्य क्षेत्रात भरीव सेवा देण्याची आवश्यकता आहे. प्रीमियम सेंटरमुळे मध्य भारतातील नेत्र आरोग्य क्षेत्रात सेवा देणारी माधव नेत्रालय ही महत्त्वाची संस्था ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

दृष्टिहीनांची समस्या समाजासाठी शोभनीय नाही: सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
दृष्टिहीनांची समस्या समाजासाठी शोभनीय नाही. संघाच्या कार्यातून समाजात सेवाकार्याची दृष्टी निर्माण होत आहे. समाजानेही यात सहभाग घेतल्याने संघासमोरील अडचणी दूर झाल्या व देशहिताच्या कार्याचा मार्ग सुकर झाला. सेवाकार्य दयाभावाने नव्हे, तर मनात आपुलकीचा भाव उत्पन्न करूनच चालवले जाऊ शकते. सेवेतून जीवनदृष्टी मिळते, असे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले.

 

Web Title: A new chapter of India developed through the penance of the RSS, Prime Minister Narendra Modi's statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.