सदर उड्डाणपुलाला जोडून संविधान चौकापर्यंत जोडला जाणार नवा पूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 18:23 IST2025-07-24T18:23:18+5:302025-07-24T18:23:55+5:30
वाहतूककोंडी संपवण्यासाठी नवा उपाय : बांधकामासाठी ३४ कोटींचा खर्च येणार

A new bridge will be built to connect the said flyover to Samvidhan Chowk.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डिझाइनमधील त्रुटीमुळे संविधान चौकाकडे (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) चुकीच्या पद्धतीने उतरणाऱ्या सदर उड्डाणपुलाच्या समस्येवर आता जो उपाय सुचवण्यात आला आहे, तो आणखी गुंतागुंतीचा आणि क्लिष्ट आहे. सदर उड्डाणपुलाला लिबर्टी टॉकीजजवळून एक नवीन पूल जोडला जाईल, जो एलआयसी चौक, कस्तुरचंद पार्कमार्गे संविधान चौकाशी जोडला जाईल. सुमारे ३४ कोटी रुपये खर्चुन बांधल्या जाणाऱ्या ६५० मीटर लांबीच्या या पुलामुळे सुलभतेपेक्षा अडचणीच अधिक निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कस्तुरचंद पार्क मैदानावरून कामठी रोडवरील मेट्रो पुलाखालून हा नवीन पूल केपी ग्राउंडच्या दिशेने वळेल. त्यामुळे त्या रस्त्यावरून बस किंवा ट्रक कदाचित जाऊ शकणार नाहीत. सूत्रांच्या मते, हा पूल बांधण्याची जबाबदारी महामेट्रोला देण्यात आली आहे.
एलआयसी चौकात पुलाची प्रस्तावित उंची ३.६ मीटर असल्यास बस व मध्यम आकाराचे ट्रक तेथून जाऊ शकणार नाहीत. एलआयसी चौकातून उतरणारा रॅम्प कस्तूरचंद पार्कमध्ये प्रवेश करेल आणि सध्याच्या रस्त्याच्या समांतर जाईल, मेट्रो स्टेशन पार करेल आणि शेवटी संविधान चौकाला जोडेल. संविधान चौकात कस्तुरचंद पार्कसमोरील ट्रॅफिक आयलँड हलवावे लागेल. प्रस्तावित पुलाची रुंदी ९ मीटर असून दोन लेन असतील. काही भागांत ही रुंदी ११ मीटर असेल. एनआयटी बिल्डिंग, एलआयसी चौक आणि मेट्रो स्टेशनखाली पिलर उभारण्यात येतील. सध्या हे काम सुरू आहे. नवीन आर्म तयार झाल्यानंतर सदर उड्डाणपुलाला तीनच्या ऐवजी चार एंट्री आणि एग्झिट पॉइंट्स असतील. प्रस्तावित नवीन आर्मसाठी कस्तुरचंद पार्कची काही जमीन संपादित करावी लागेल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासाठी मंजुरी दिली आहे. मात्र, कायदेशीर प्रक्रियेस सुमारे चार महिने लागू शकतात.
कस्तुरचंद पार्कची जमीन संपादित करणे सोपे असेल का?
ग्रेड-१ हेरिटेज साइट असलेल्या कस्तुरचंद पार्कची जमीन संपादित करणे सोपे नाही. यूडीसीपीआर नियमानुसार, अशा कोणत्याही बदलासाठी प्रथम हेरिटेज समितीची मंजुरी घेणे आवश्यक आहे. यासाठी हेरिटेज इम्पॅक्ट असेसमेंट, जनतेच्या हरकती आणि सविस्तर तांत्रिक कारणांची गरज असते; जेणेकरून हे सिद्ध करता येईल की, या प्रकल्पामुळे पार्कच्या ऐतिहासिक स्वरूपाला कोणतीही हानी पोहोचणार नाही.
सदर उड्डाणपुलाचा संपूर्ण वापर होऊ शकलेला नाही
कस्तुरचंद पार्कच्या दिशेने उतरण्यातील अडचणीमुळे अनेक वाहनचालक या पुलाचा वापर टाळतात. सुमारे २१९ कोटी रुपये खर्चुन बांधलेला ३.९६ किमी लांब सदर उड्डाणपूल अजूनही पूर्ण क्षमतेने वापरात आलेला नाही. नवीन ६५० मीटर लांब रॅम्प जोडल्यावर पुलाची एकूण लांबी ४.६ किमी होईल. भोपाळमधील ९० अंश वळणाचा पूल चर्चेत होता. सदर उड्डाणपुलाच्या आर्मचे प्रस्तावित वळणही तत्सम असल्याचे सांगितले जात आहे. जाणकार या प्रस्तावित नवीन पुलाच्या डिझाइनला अव्यावहारिक मानत आहेत.