मोबाईलवेडापायी वडील रागावल्याने अल्पवयीन विद्यार्थिनीने संपविले जीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2023 22:30 IST2023-06-29T22:29:41+5:302023-06-29T22:30:05+5:30
Nagpur News वडिलांनी मोबाईल जास्त पाहू नको असे सांगत अभ्यासासाठी रागावल्याचा राग धरून एका अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आपले जीवन संपविले.

मोबाईलवेडापायी वडील रागावल्याने अल्पवयीन विद्यार्थिनीने संपविले जीवन
नागपूर : वडिलांनी अभ्यासासाठी रागावल्याचा राग धरून एका अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आपले जीवन संपविले. ही घटना बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास घडली असून या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
नंदिनी अविनाश मोहिते (वय १५, रा. मेहरबाबानगर) असे गळफास घेतलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. नंदिनी दहावी उत्तीर्ण होऊन ११ वीला गेली होती. तिच्या कुटुंबात आई-वडील आणि लहान बहीण आहे. तिचे वडील खासगी शिक्षण संस्थेत कार्यरत आहेत. बुधवारी रात्री नंदिनी मोबाइल पाहण्यात गुंग होती. वडिलांनी तिला अभ्यासावर भर देण्यास सांगितले. यामुळे तिला राग आला. रागाच्या भरात ती वरच्या माळ्यावरील खोलीत गेली. तेथे तिने सिलिंग फॅनला ओढणी बांधून गळफास घेतला. रात्री ९:३० वाजता कुटुंबीयांनी नंदिनीला आवाज दिला. तिने दरवाजा न उघडल्यामुळे कुटुंबीयांना चिंता वाटली. त्यांनी दाराचा कोंडा तोडून दार उघडले असता नंदिनी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. तिला एम्स रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे नंदिनीच्या आई-वडिलांना जबर मानसिक धक्का बसला आहे. मुलीचा मृतदेह पाहून त्यांच्या पायाखालील वाळू सरकली. बेलतरोडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
.............