नागपुरात किरकोळ वाद पेटला, गुंडाची घराजवळच हत्या
By योगेश पांडे | Updated: April 26, 2024 16:42 IST2024-04-26T16:40:20+5:302024-04-26T16:42:06+5:30
Nagpur : अजनीतील हावरापेठेत खळबळ

Murder in Ajni Hawrahpeth, Nagpur
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोन दिवसांअगोदर झालेल्या किरकोळ वादाचा बदला घेण्यासाठी पाचहून अधिक आरोपींनी एका कुख्यात गुंडाची हत्या केली. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हावरापेठेत ही घटना घडली असून यामुळे खळबळ उडाली आहे.
अमोल सुरेशराव मेहर (३६, हावरापेठ, गल्ली क्रमांक दोन) असे मृतकाचे नाव आहे. अमोल हा हावरापेठेतील कुख्यात गुंड होता व त्याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल होते. काही काळापासून तो प्रॉपर्टी डिलिंगची कामे करत होता. दोन दिवसांअगोदर त्याचा वस्तीजवळ राहणाऱ्या रजत उर्फ लल्ला किशोर शर्मा (३०, हावरापेठ) याच्याशी किरकोळ गोष्टीवरून वाद झाला होता. गुरुवारी अमोल त्याच्या मित्रांसोबत वर्धा जिल्ह्यातील आंजीगाव येथील साईट पाहण्यासाठी गेला होता. तेथेच त्याची सासरवाडी असून तेथून वांगे घेऊन तो घरी परतला. घरच्यांना वांगे देऊन तो रात्री साडेदहा वाजता मंगेश नावाच्या मित्राकडे परत केला. मंगेशच्या घराजवळच रजत तसेच त्याचे साथीदार सुनयन अमरीत खर्चे (३२, रतन नगर), नितेश संजय मस्के (२८, हावरापेठ), कार्तिक किशोर शर्मा (२०, हावरापेठ) व इतर सहकाऱ्यांनी अमोलला घेरले. त्यांनी दोन दिवसांअगोदरच्या वादावरून त्याला शिवीगाळ सुरू केली. अमोलदेखील आक्रमक झाला. हे पाहताच आरोपींनी त्याच्यावर चाकू, तलवारींनी वार केले. मंगेशने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यालादेखील मारहाण करण्यात आली. वस्तीतील लोकांनी अमोलचे वडिल सुरेशराव यांना माहिती दिली. त्यांनी धाव घेतली असता आरोपींनी त्यांनादेखील खाली पाडले. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. अमोलला मेडिकल इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या वडिलांच्या तक्रारीवरून अजनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी रात्री रजत, सुनयन व नितेश यांना अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे.
परिसरात तणाव
अमोलच्या हत्येनंतर हावरापेठ परिसरात तणावाचे वातावरण होते. अमोलविरोधात अगोदर अनेक गुन्हे दाखल होते. एका फायरिंगच्या प्रकरणानंतर तो चर्चेत आला होता. मध्यरात्रीनंतर पोलिसांची गस्त वाढविण्यात आली होती. पोलीस या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज शोधत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.