‘आज तुला कायमचाच संपवतो’ म्हणत चाकूने वार
By योगेश पांडे | Updated: May 16, 2024 15:34 IST2024-05-16T15:33:50+5:302024-05-16T15:34:15+5:30
Nagpur : सहजपणे इथे काय करत आहे असे विचारणे एका मजुराला पडले महागात

A man was attacked just for asking a simple question
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : परिचयातील व्यक्तीला सहजपणे इथे काय करत आहे असे विचारणे एका मजुराला चांगलेच महागात पडले. आरोपीने मजुराला विनाकारण शिवीगाळ करत मानेवर चाकूने वार केले व आज तुला कायमचाच संपवतो असे म्हणत जीव घेण्याचा प्रयत्न केला. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
चंदू दामोदर धकाते (४८, बिनाकी मंगळवारी) असे तक्रारदाराचे नाव असून पिंटू दशरथ गुप्ता (२५, बिनाकी मंगळवारी) हा आरोपी आहे. १५ मे रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास चंदू कामावरून घराकडे परत जात असताना त्यांना त्यांचा मित्र दिसला. तुकडोजी सभागृहाजवळ दोघेही बोलत उभे असताना पिंटू तेथे आला. चंदू यांनी सहजपणे तू येथे काय करत आहेस असे विचारले असता पिंटू संतापला. त्याने चंदू यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. चंदू यांनी त्याला हटकले असता पिंटूने चाकूने त्यांच्या मानेवरच वार केले. हा प्रकार पाहून चंदूचा मित्र पळून गेला. तर मानेतून रक्ताची धार निघत असल्याने पिंटूदेखील फरार झाला. चंदू यांनी पत्नीला फोन करून प्रकार सांगितला. त्यांच्या पत्नीने घटनास्थळी येऊन त्यांना मेयो इस्पितळात नेले. चंदूच्या तक्रारीवरून पिंटूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक झाली आहे.