नागपूर येथील उपमुख्यमंत्र्यांच्या दोन मजली देवगिरी बंगल्यात लागणार ‘लिफ्ट’
By आनंद डेकाटे | Updated: November 10, 2025 20:19 IST2025-11-10T20:18:24+5:302025-11-10T20:19:57+5:30
Nagpur : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागपुरातील देवगिरी या शासकीय इमारतीमध्ये लिफ्ट लावण्यात येणार आहे. देवगिरी हा बंगला दोन माळ्यांचा आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्यांवतीने कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

A lift will be installed in the two-storey Devagiri bungalow of the Deputy Chief Minister in Nagpur.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागपुरातील देवगिरी या शासकीय इमारतीमध्ये लिफ्ट लावण्यात येणार आहे. देवगिरी हा बंगला दोन माळ्यांचा आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्यांवतीने कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
नागपुरात येत्या ८ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन होणार आहे. त्यासाठीची तयारी सुरू झाली आहे. मंत्र्यांच्या बंगल्यांवर वारेमाप खर्च होत असल्याची टीका केली जात असली तरी आवश्यकतेनुसारच बंगल्यांची दुरुस्ती व नवीन कामे केली जात असल्याचे सांगितले जाते. रविभवन येथील मंत्र्यांच्या बंगल्यांची दुरुस्ती सुरू झाली आहे. यातील तीन बंगल्यांचे संपूर्ण छत बदलवले जात आहे. याच परिसरात राज्यातील दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचेही शासकीय बंगले आहेत. यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या देवगिरी या बंगल्यामध्येही काही महत्त्वाच्या दुरुस्तींची कामे हाती घेण्यात आली आहेत. वरच्या मजल्यावर दोन बेडरूम आहेत. या बंगल्यात लिफ्ट लावण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यावर ३५ लाख रुपयांचा खर्च येणार असल्याचे सांगितले जाते. यासोबतच खाली एक नवीन बेडरूमसुद्धा बांधण्यात येत आहे. या संपूर्ण बंगल्याच्या दुरुस्तीवर यंदा ७० लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे. देवगिरी बंगल्याचा परिसर हा किमान दोन ते तीन एकरचा आहे. मोठा परिसर असल्याने त्याच्या दुरुस्तीचा खर्चही अधिक येत असल्याचे सांगितले जाते.