सोने तस्कराची डीआरआयच्या सहाव्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या
By मोरेश्वर मानापुरे | Updated: June 17, 2024 21:17 IST2024-06-17T21:08:24+5:302024-06-17T21:17:40+5:30
अधिकाऱ्यांनी त्याला चौकशीसाठी नागपुरात आणले होते. रविवारी रात्री डीआरआय अधिकाऱ्यांकडून देसाई याची चौकशी केली जात असताना त्याने खिडकीतून अचानक उडी मारली.

सोने तस्कराची डीआरआयच्या सहाव्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या
नागपूर : दोन कोटींची सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या एका व्यक्तीने नागपूर येथील सेमिनरी हिल्स येथील सीजीओ कॉम्प्लेक्समधील महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) सहाव्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केली.
ही घटना रविवारी रात्री उशिरा सेमिनरी हिल्स येथील डीआरआय कार्यालयात घडल्याची माहिती गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिली. दीपक मच्छिंद्र देसाई (२७) असे मृत सोने तस्कराचे नाव आहे. तो दुबईतून तस्करी करून आणलेले सोने सांगलीतून उत्तर प्रदेशात विक्रीसाठी नेत होता. वाराणसीहून लखनौला जाणाऱ्या कारमध्ये दोन कोटी रुपयांचे सोने सापडल्यानंतर डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी १४ जून रोजी त्याला व त्याच्या साथीदाराला अटक केली होती.
अधिकाऱ्यांनी त्याला चौकशीसाठी नागपुरात आणले होते. रविवारी रात्री डीआरआय अधिकाऱ्यांकडून देसाई याची चौकशी केली जात असताना त्याने खिडकीतून अचानक उडी मारली. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, पण गंभीर दुखापतीमुळे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.