आईच्या डोळ्यासमोरच काळजाचा तुकडा हिरावला; ४ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू
By योगेश पांडे | Updated: May 15, 2024 18:59 IST2024-05-15T17:11:21+5:302024-05-15T18:59:04+5:30
Nagpur : अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत चार वर्षीय मुलाचा मृत्यू

A four-year-old boy died in front of his mother in a collision with a vehicle
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लहान मुलाला सोबत घेऊन सामान खरेदी करण्यासाठी गेलेल्या आईच्या डोळ्यासमोर तिच्या काळजाचा तुकडा नेहमीसाठी हिरावल्या गेला. अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत चार वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही ह्रद्यद्रावक घटना घडली.
विवान रुपेश आमदरे (४, आदर्शनगर, दिघोरी) असे मृतक चिमुकल्याचे नाव आहे. १३ मे रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास त्याची आई करिष्मा (३२) या विवानला घेऊन दुचाकीने गांधीबागेत सामान खरेदीसाठी गेल्या होत्या. तेथून परत येत असताना एलओसी चौकातील सिमेंट मार्गावर वेगाने आलेल्या अज्ञात चारचाकी वाहनाने करिष्मा यांच्या दुचाकीला धडक दिली. यात करिष्मा व विवान दोघेही खाली पडले. चारचाकी चालक तेथून वाहनासह फरार झाला. घटनास्थळावरील लोकांनी गंभीर जखमी झालेल्या विवानला एका खाजगी इस्पितळात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने त्याच्या आईवडिलांना मोठा धक्का बसला आहे. काही वेळांअगोदर हसून बोलणारा विवान आपल्यात नाही यावर विश्वासच बसत नव्हता. त्याचे वडिल रुपेश यांच्या तक्रारीवरून नंदनवन पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.