'चारित्र्यसंपन्न युवकांमुळेच घडेल विकसित भारत' उपराष्ट्रपती राधाकृष्णन उद्घाटनाप्रसंगी बोलतांना
By गणेश हुड | Updated: March 21, 2026 15:46 IST2026-03-21T15:44:53+5:302026-03-21T15:46:07+5:30
Nagpur : भारतीय युवा संसद परिषद ही केवळ चर्चेचे व्यासपीठ नसून भविष्यातील जबाबदार नागरिक आणि सक्षम नेतृत्व घडविण्याचे प्रभावी माध्यम आहे, चारित्र्यसंपन्न युवकांमुळेच विकसित भारत घडेल

'A developed India will be possible only because of youth with character', Vice President Radhakrishnan said at the inauguration
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय युवा संसद परिषद ही केवळ चर्चेचे व्यासपीठ नसून भविष्यातील जबाबदार नागरिक आणि सक्षम नेतृत्व घडविण्याचे प्रभावी माध्यम आहे, चारित्र्यसंपन्न युवकांमुळेच विकसित भारत घडेल, असे प्रतिपादन शनिवारी उपराष्ट्रपती सी. पी.राधाकृष्णन यांनी केले. रेशीमबाग येथील महर्षी व्यास सभागृहात आयोजित २९ व्या भारतीय युवा संसद परिषदेचे उद्घाटन सी. पी. राधाकृष्णन आणि महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल, केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी तसेच परिषदचे राष्ट्रीय संयोजक आशुतोष जोशी उपस्थित होते.
राधाकृष्णन म्हणाले , युवा संसदेमुळे तरुणांच्या विचारांना दिशा मिळते आणि चारित्र्याची जडणघडण होते. चारित्र्यनिर्मिती हा भक्कम नेतृत्वाचा पाया असून, चारित्र्यसंपन्न व्यक्तीचे नेतृत्व अधिक प्रभावी ठरते. देशाची ताकद ही त्याच्या तरुण लोकसंख्येवर अवलंबून असते. भारतात सुमारे ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांखालील असून ही मोठी जमेची बाजू असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. कृष्ण गोपाल यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक आशुतोष जोशी यांनी केले.
युवा शक्तीच देशाची ताकद : राज्यपाल
भारताची युवा पिढी ही देशाची सर्वात मोठी ताकद आहे. ही उत्साही व गतिमान पिढी राष्ट्र निर्माणात मोलाची ठरणार आहे. २०४७ या वर्षापर्यंत विकसित भारत घडविण्यासाठी केवळ आर्थिक योगदानापुरते मर्यादित राहता येणार नाही. यासोबतच सामाजिक आणि सांस्कृतिकही योगदान महत्त्वाचे ठरणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले. विविधतेत एकता हे आपल्या देशाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. भाषा, धर्म, जात, पंथ देशातील विविध भागात वेगवेगळ्या असल्या तरी देश एकसंघ असल्याचे दिसून येतो. आजवर देशावर अनेक आक्रमणे झाली आहेत. मात्र आपल्या एकसंघतेच्या बळावर ही आक्रमणे परतवून लावल्याचे ते म्हणाले. भारतीय युवा संसद परिषदेला सहाव्यांदा उपस्थित राहात असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.