देवलापार परिसरात वाघाची दहशत, गुराख्याचा घेतला जीव
By जितेंद्र ढवळे | Updated: September 20, 2023 14:53 IST2023-09-20T14:48:38+5:302023-09-20T14:53:35+5:30
शिकारीकरिता दबा धरून बसलेल्या वाघाने घातली झडप

देवलापार परिसरात वाघाची दहशत, गुराख्याचा घेतला जीव
नागपूर : देवलापार वनपरिक्षेत्रात येणाऱ्या करवाही बीटमध्ये वाघाने गुराख्याची शिकार केल्याची घटना मंंगळवारी रात्री उघडकीस आली. यशवंत वैद्य (४६, रा. खंडासा, ता. कुरई, जि. सिवनी (मध्य प्रदेश) असे मृताचे नाव आहे.
देवलापार वनपरिक्षेत्रांतर्गत येणारे करवाही बीट हे मध्य प्रदेशला लागून आहे. नेहमीप्रमाणे यशवंत हे गाई-म्हशी घेऊन करवाहीच्या जंगलात आले होते. सायंकाळी परतत असताना शिकारीकरिता दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर झडप घातली. त्यात यशवंत यांचा जागीच मृत्यू झाला.
माहितीनुसार, सायंकाळी म्हशी व गाई घरी पोहोचल्या तरी यशवंत आले नाहीत. त्यामुळे घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. ग्रामस्थांनी जंगलात शोध घेतला असता, त्यांचा मृतदेह संध्याकाळी ७:३०च्या सुमारास आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच देवलापारचे वनपरिक्षेत्र अधिकारी ऋषिकेश पाटील व ठाणेदार सतीश मेश्राम यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठले. यानंतर मध्य प्रदेशमधील वन विभागाचे अधिकारी व कर्मचारीदेखील घटनास्थळी पोहोचले.