पंतप्रधान गोव्यात पोहोचले, पण नागपूरकर ‘पार्किंग’मध्येच अडकले; ढिसाळ नियोजनाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2022 11:16 IST2022-12-12T11:13:06+5:302022-12-12T11:16:08+5:30
केवळ पार्किंगमधून वाहने निघायलाच लागले अडीच तास

पंतप्रधान गोव्यात पोहोचले, पण नागपूरकर ‘पार्किंग’मध्येच अडकले; ढिसाळ नियोजनाचा फटका
नागपूर : ‘गरज सरो अन् वैद्य मरो’ ही म्हण एरवी नेहमीच वापरली जाते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या ११ प्रकल्पांच्या लोकार्पण-पायाभरणी कार्यक्रमादरम्यान हजारो नागरिकांना ही म्हण प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली. कार्यक्रम संपल्यावर पंतप्रधान गोव्याला रवाना झाले व तेथे पोहोचलेदेखील. मात्र एम्सच्या शेजारी असलेल्या वाहनांच्या पार्किंगमधून बाहेर निघायला लोकांना अडीच ते तीन तास प्रतीक्षा करावी लागले. हजारो नागरिकांना प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका बसला.
पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला लोक आणण्यासाठी भाजपच्या नेत्यांना व पदाधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली होती. विदर्भातील विविध ठिकाणांहून लोक गाड्या व बसेसमधून नागपुरात पोहोचले. दुपारी एकच्या सुमारास कार्यक्रम संपल्यानंतर पंतप्रधान विमानतळाकडे रवाना झाले. तर लोक वाहनांकडे जाऊ लागले. ज्या ठिकाणी वाहने लावण्यात आली होती, त्या मैदानाला एकच एंट्री व एकच एक्झिट होती. त्यामुळे तेथे प्रचंड गर्दी झाली. आश्चर्याची बाब म्हणजे इतर नेतेमंडळी निघताच वाहतूक पोलिसदेखील सुस्तावले. समोर इतका मोठा गोंधळ दिसत असतानादेखील पोलिसांनी वाहने सुरळीत बाहेर काढण्यासाठी कुठलाही पुढाकार घेतला नाही. मैदानात शेकडो वाहने होती व अनेक ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिलादेखील अन्नपाण्याविना वाहनांमध्ये बसले होते. परंतु वाहने एक इंचदेखील समोर सरकत नव्हती. यामुळे काही जणांमध्ये वाददेखील झाले.
अखेर पोहोचले पोलिस
प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या बसेसदेखील याच गर्दीत अडकल्या होत्या. दीड तास प्रतीक्षा केल्यानंतर अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांना या गोंधळाची माहिती देण्यात आली. सोनेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप सागर तेथे पोहोचले. त्यांनी त्या गोंधळातून वाहने काढण्यास सुरुवात केली. मात्र प्रचंड कोंडी झाली होती व त्यामुळे अनेकांना अडीच तासांहून अधिक वेळ अडकून रहावे लागले.
कार्यकर्त्यांमध्ये संताप
ज्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना कार्यक्रमस्थळी आणले होते, ते या कोंडीच्या वेळी तेथून गायब झाले होते. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप होता. अनेकांनी सार्वजनिकपणे आपल्या भावना व्यक्तदेखील केल्या.