मेंढे, वंजारी, वाघमारे यांना दणका, हायकोर्टाने जामीन अर्ज फेटाळले
By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: August 12, 2025 12:17 IST2025-08-12T12:16:24+5:302025-08-12T12:17:20+5:30
शालार्थ आयडी घोटाळ्यामधील आरोपी : वैशाली जामदार यांना जामीन मंजूर

A blow to Mendhe, Vanjari, Waghmare, High Court rejects bail applications
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजपाचे माजी खासदार सुनील मेंढे यांचे बंधू व माजी शिक्षण उपसंचालक सतीश बाबूराव मेंढे, राज्य शिक्षण मंडळाचे नागपूर विभागीय अध्यक्ष व तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी चिंतामण गुलाबराव वंजारी आणि नागपूर शिक्षण उपसंचालक कार्यालयातील वेतन विभागाचे निलंबित अधीक्षक नीलेश बाबूराव वाघमारे यांनी संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये जामीन मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेले अर्ज मंगळवारी फेटाळण्यात आले. नागपूर शिक्षण विभागाच्या माजी उपसंचालक व छत्रपती संभाजीनगर विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव वैशाली जगन्नाथ जामदार यांना मात्र तांत्रिक कारणांमुळे जामीन मंजूर करण्यात आला.
न्यायमूर्ती ऊर्मिला जोशी-फलके यांनी हा निर्णय दिला. मेंढे व वाघमारे यांनी अटकपूर्व जामिनासाठी तर, वंजारी व जामदार यांनी नियमित जामिनासाठी अर्ज केला होता. घोटाळ्यातील आरोपींविरुद्ध सदर पोलिसांनी ११ एप्रिल २०२५ रोजी एफआयआर दाखल केला आहे. तसेच, राज्य सरकारने घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी आर्थिक लाभाकरिता संगनमत करून ५०० पेक्षा जास्त अपात्र शिक्षकांची नियुक्ती केली आहे. पराग पुडके यांची जेवनाळा येथील नानाजी पुडके विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी केलेल्या अवैध नियुक्तीची तक्रार झाल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला.
काही दिवसांपूर्वी पोलिसांनी पराग पुडके, नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड, अधीक्षक नीलेश मेश्राम, लिपिक संजय बोदाडकर, लिपिक सूरज नाईक, परसटोला (गाेंदिया) येथील चंद्रभागा विद्यालयाचे शिक्षक महेंद्र म्हैसकर, अर्जुनी मोरगाव (जि. गोंदिया) येथील शिक्षण संस्था संचालक राजू मेश्राम व भंडारातील राजश्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चरण चेतुले या आठ आरोपींविरुद्ध सरकारची फसवणूक करणे, बनावट दस्तावेज तयार करणे, बनावट दस्तावेज खरे भासवून उपयोगात आणणे, कट रचणे इत्यादी गुन्ह्यांतर्गत प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात खटला दाखल केला आहे.