५२ वर्षीय शिक्षकाकडून ट्यूशनमधील विद्यार्थिनीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2022 21:04 IST2022-10-22T21:03:55+5:302022-10-22T21:04:19+5:30
Nagpur News ट्यूशनला जाणाऱ्या अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंग करणाऱ्या ५२ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे.

५२ वर्षीय शिक्षकाकडून ट्यूशनमधील विद्यार्थिनीचा विनयभंग
नागपूर : ट्यूशनला जाणाऱ्या अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंग करणाऱ्या ५२ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. संबंधित आरोपी हा विद्यार्थिनीचा शिक्षकच असून या कृत्याने त्याने शिक्षकी पेशाला काळिमा फासला आहे. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
अरविंद सत्यनारायण माहेश्वरी (५२, जोशीवाडी, अजनी) असे आरोपीचे नाव आहे. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी संबंधित मुलगी ही अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोचिंग क्लासला जात होती. ती क्लासला नियमित जायची. मात्र ११ ऑक्टोबरपासून तिने क्लासला जाणे बंद केले. ती तेथे जाण्यास टाळाटाळ करत असल्याने तिच्या आईने तिला विश्वासात घेऊन विचारणा केली. तेव्हा मुलीने शिक्षकच वाईट नजरेने पाहत असल्याचे सांगितले. माहेश्वरी वाईट पद्धतीने स्पर्श करतो. तसेच ११ ऑक्टोबर रोजी सर्व विद्यार्थी निघून गेल्यावर त्याने तिचा विनयभंग केल्याची बाब तिने सांगितली. हे ऐकून तिच्या आईला मोठा धक्का बसला. कुटुंबीयांनी अजनी पोलीस ठाणे गाठून आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.