80 percent posts in NMC vacant; The target completed only | मनपात ८० टक्के पदे रिक्त; उद्दिष्ट मात्र पूर्ण
मनपात ८० टक्के पदे रिक्त; उद्दिष्ट मात्र पूर्ण

ठळक मुद्देअग्निशमन विभागाचे २.७० कोटींचे उत्पन्न

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उत्पन्नाचे उद्दिष्ट गाठण्यात महापालिकेचे बहुसंख्य विभाग नापास ठरले आहेत. मात्र अग्निशमन विभाग याला अपवाद ठरला. विशेष म्हणजे या विभागात ८० टक्क्यांहून अधिक पदे रिक्त असताना विभागाला २०१८-१९ या वर्षात १.९८ कोटीचे शुल्क वसुलीचे उद्दिष्ट दिले असताना गेल्या आर्थिक वर्षात २ कोटी ६९ लाख ९६ हजारांचे शुल्क वसूल केले आहे.
अग्निशमन विभागाच्या उत्पन्नात याहून अधिक वाढ झाली असती. परंतु ८ ऑक्टोबर २०१५ च्या उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उंच इमारतींवर आकारण्यात येणारे शुल्क बंद करण्यात आले आहे. ही वसुली सुरू राहिली असती तर हा विभाग आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याला मदत झाली असती. उंच इमारतींवर शुल्क आकारण्याचा सुधारित प्रस्ताव महापालिका सभागृहाच्या मंजुरीनंतर राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. यावर अद्याप निर्णय झालेला नाही.
अग्निशमन विभागाचे मुख्य काम नैसर्गिक आपत्ती वा आगीची घटना घडल्यास जीवित व मालमत्तेचे नुकसान रोखण्याचे आहे. आपली जबाबदारी पार पाडून विभागाने शुल्क वसुलीतही आघाडी घेतली आहे. रिक्त पदे भरून विभागाला बळ देण्याची गरज आहे. आस्थापनेनुसार विभागात ८७२ पदे मंजूर आहेत. परंतु सध्या १५८ कर्मचारी कार्यरत असून, ७१४ पदे रिक्त आहेत. असे असूनही या विभागातील कर्मचारी व अधिकारी सक्षमतेने काम करीत आहेत.
विभागात सशक्त कर्मचाऱ्यांची गरज असते. या विभागातील बहुसंख्य कर्मचारी सेवानिवृत्तीच्या मार्गावर आले आहेत. मुख्य अग्निशमन अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकाऱ्यांची महत्त्वाची पदे रिक्त आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमन विभागाला शुल्क वसुलीतून ११ लाख ७८ हजार ९८२ रुपये, पाणीपुरवठा, विहीर सफाई, फटाके, पर्यावरण शुल्क यातून १ कोटी ५ लाख ९१ हजार ५८४ रुपये, उंच व लहान इमारत निरीक्षण शुल्क, अग्निशमन सेवा शुल्क यातून १ कोटी ५२ लाख २५ हजार ८१६ रुपये उत्पन्न झाले.
बचाव कार्यासाठी कर्मचारी नाही
शहरात आठ अग्निशमन स्टेशन आहेत. प्रत्येक स्टेशनवर २४ तास कर्मचारी ड्युटीवर असतात. विभागातील पदे रिक्त होत असल्याने मनुष्यबळाची समस्या निर्माण झाली आहे. एखादी मोठी घटना घडल्यास बचावासाठी कर्मचारी व वाहन उपलब्ध करताना विभागाला चांगलीच कसरत करावी लागते. सध्या ९० फायरमन कार्यरत आहेत. त्रिमूर्तीनगर अग्निशमन केंद्र बांधून सज्ज आहे. परंतु मनुष्यबळ नसल्याने ते सुरू झालेले नाही. ५६ चालकांची निवड करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून फायरमनचे काम करून घेणे शक्य आहे.
सर्वांच्या सहकार्याने उद्दिष्ट पूर्ती
अग्निशमन विभागात मनुष्यबळ वाढविण्याची नितांत गरज आहे. नैसर्गिक आपत्ती वा आग आटोक्यात आणताना कुशल मनुष्यबळाची गरज असते. परंतु पदे रिक्त असल्याने अडचणी येतात. असे असूनही उपलब्ध मनुष्यबळाचा वापर करून प्रयत्न केले जातात. उद्दिष्टाच्या तुलनेत अधिक शुल्क वसुली झाली आहे. ही चांगली बाब आहे. क र्मचारी व अधिकारी या सर्वांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले.
राजेंद्र उचके,अग्निशमन अधिकारी महापालिका

 

 


Web Title: 80 percent posts in NMC vacant; The target completed only
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.