नागपूर जिल्ह्यातील १४६ पैकी ७७ उमेदवारांना हजार मतेही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 10:54 PM2019-10-31T22:54:56+5:302019-10-31T23:34:00+5:30

छोट्या-छोट्या पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांना मतदारांनी नाकारले आहे. जिल्ह्यातील १२ जागांसाठी निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या एकूण १४६ उमेदवारांपैकी ७७ उमेदवार एक हजार मतेही मिळवू शकले नाहीत.

77 out of 146 candidates in Nagpur district do not even have a thousand votes | नागपूर जिल्ह्यातील १४६ पैकी ७७ उमेदवारांना हजार मतेही नाही

नागपूर जिल्ह्यातील १४६ पैकी ७७ उमेदवारांना हजार मतेही नाही

Next
ठळक मुद्देछोट्या पक्षाच्या उमेदवारांना मतदारांनी नाकारले : बहुतांश अपक्षांची झोळी रिकामीच

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभा निवडणुकीनंतर निकालाचे पोस्टमार्टम केले जात आहे. हार-जिंकण्याची समीक्षा करून त्यांची कारणे शोधली जात आहेत. पहिल्या दोन उमेदवारांचीच चर्चा होत आहे. यादरम्यान उमेदवारांना मिळालेल्या मतांवर नजर टाकल्यास हे स्पष्टपणे दिसून येते की, छोट्या-छोट्या पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांना मतदारांनी नाकारले आहे. जिल्ह्यातील १२ जागांसाठी निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या एकूण १४६ उमेदवारांपैकी ७७ उमेदवार एक हजार मतेही मिळवू शकले नाहीत.
अशा उमेदवारांमध्ये अपक्षांचा तसेच छोट्या पक्षाच्या उमेदवारांचाही समावेश आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात दोन जागांवर विजय मिळवणाऱ्या प्रहार व दिल्लीची सत्ता काबीज करणाऱ्या आम आदमी पार्टीचाही समावेश आहे. प्रहारच्या उमेदवाराने रामटेकमध्ये मात्र चांगली मते घेतली. महाराष्ट्राच्या राजकारणात कधीकाळी शक्तिशाली असलेल्या खोरिपा असो की, बळीराजासारख्या पक्षाचा उमेदवार असो, मतदारांनी त्यांना तीन आकड्यापर्यंतच मर्यादित ठेवले. यापैकी अनेक पक्षाची नावे केवळ निवडणुकीतच ऐकायला मिळतात. नोटाला मात्र प्रत्येक मतदार संघात हजारापेक्षा अधिक मत मिळाली, हे विशेष.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देण्यासाठी नागपूर दक्षिण-पश्चिम मतदार संघातून सर्वाधिक २० उमेदवार मैदानात उतरले होते. मुख्यमंत्र्यांच्या विजयादरम्यान केवळ मोठ्या पक्षाच्या उमेदवारांनाच हजारापेक्षा अधिक मते मिळू शकली. १५ उमेदवार चार आकड्यापर्यंतही पोहोचू शकले नाही. यात राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी, बहुजन मुक्ती पार्टी, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी, सीपीआय (एमएल) रेड स्टार, बळीराजा पार्टी, महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी, खोरिपासारख्या पक्षाच्या उमेदवारांचा समावेश आहे. बहुतांश उमेदवार ५०० मताच्या आतच राहिले. आम आदमी पार्टीच्या उमेदवाराने कसेतरी एक हजारावर मते घेतली. दक्षिण नागपुरातही १० उमेदवारांचे तेच हाल राहिले. यात पिछडा समाज पार्टी, बहुजन महा पार्टी, भारतीय मानवाधिकार, फेडरल पार्टी, आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया, देश जनहित पार्टी, बहुजन मुक्ती पार्टी, हम भारतीय पार्टीच्या उमेदवारांचा समावेश आहे. अपक्ष म्हणून मैदानात उतरलेले माजी उपमहापौर सतीश होले व किशोर कुमेरिया आणि प्रमोद मानमोडे हेच केवळ समाधानकारक मते घेऊ शकले.पश्चिम नागपुरातही हीच परिस्थिती राहिली. पश्चिम नागपुरातील १२ पैकी ७ उमेदवारही हजार मते घेऊ शकले नाहीत. मध्य नागपुरातील १३ पैकी ८, उत्तर नागपुरातील १४ पैकी ८ उमेदवार सुद्धा हजार मतांचा आकडा गाठू शकले नाहीत. राष्ट्रीय जनसंभावना पार्टी, मायनॉरिटीज डेमोक्रेटिक पार्टी, राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीतील उमेदवारांचा यात समावेश आहे. पूर्व नागपुरात छत्तीसगड स्वाभिमान मंचच्या उमेदवारासह चार उमेदवारांना एक हजार मते मिळवता आली नाहीत. 

 ग्रामीणमध्येही परिस्थिती वाईट 
 ग्रामीण भागातील सहा मतदार संघातही हीच परिस्थिती राहिली. रामटेकमध्ये मात्र शिवसेनेचे बंडखोर उमेदवार आशिष जयस्वाल यांना अपक्ष म्हणून जनतेने विधानसभेत पोहोचवले. परंतु इतर मतदार संघात अपक्ष आणि लहान पक्षाच्या उमेदवारांना जनतेने फारसे महत्व दिले नाही. कामठीमध्ये १२ उमेदवारांपकी चार उमेदवार एक हजाराच्या आतच राहिले. हिंगणामध्ये १२ पैकी ७ उमेदवार एक हजाराच्या आतच राहिले. येथे दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयबाबू घोडमारे यांचे नामसाधर्म्य असलेले अपक्ष उमेदवाराने केवळ ४८४ मते घेतली. उमरेडमध्ये ११ पैकी ५, सवनेरमध्ये ८ पैकी ४, काटोलमध्ये १० पैकी ४ उमेदवारांनी सुद्धा हजाराच्या आताच मते घेतली. 
लहान पक्ष आणि अपक्षांसाठी सर्वात चांगली परिस्थिती रामटेकमध्ये राहिली. येथे एकीकडे अपक्ष उमेदवार आशिष जयस्वाल यांनी विजय प्राप्त केला तर एकूण ९ उमेदवारांपैकी केवळ एकाच उमेदवाराने हजारापेक्षा कमी मते घेतली. तसेच प्रहारच्या उमेदवाराने एकीकडे काटोलमध्ये केवळ ८१७ मते घेतली तर रामटेकमध्ये त्याला २४,७३५ मते मिळाली. 

Web Title: 77 out of 146 candidates in Nagpur district do not even have a thousand votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.