चार दिवसात पावसाने गाठली सप्टेंबरची ७५ टक्के सरासरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2022 22:18 IST2022-09-14T22:17:22+5:302022-09-14T22:18:40+5:30
Nagpur News गेल्या तीन दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने सप्टेंबर महिन्यात पडणाऱ्या एकूण पावसाची ७५ टक्के सरासरी गाठली आहे.

चार दिवसात पावसाने गाठली सप्टेंबरची ७५ टक्के सरासरी
नागपूर : गेल्या तीन दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने सप्टेंबर महिन्यात पडणाऱ्या एकूण पावसाची ७५ टक्के सरासरी गाठली आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीला काेरड असताना रविवारपासून चार दिवसात विदर्भात १२०.१ मि. मी. पाऊस काेसळला आहे. आतापर्यंत ११४९.६ मि. मी. पाऊस झाला आहे, जाे ३१ टक्के अधिक आहे.
दरम्यान, बुधवारीही पावसाळी वातावरण कायम हाेते. नागपूर शहरात सकाळी ८.३० पर्यंत ३७ मि. मी. पावसाची नाेंद झाली. दिवसभर जाेरात बरसात झाली नाही. पण, उघडझाप करीत रिपरिप सुरू हाेती. सकाळी काही काळ ऊनही पडले हाेते. त्यानंतर मात्र आकाश ढगांनी व्यापले. दिवसभर थांबून थांबून पावसाच्या सरी येत हाेत्या. या सरींमुळे नागरिकांचा वैताग हाेत असल्याचे दिसले. दिवसभर ३ मि. मी. पावसाची नाेंद झाली. जिल्ह्यात माैदा तालुक्यात सर्वाधिक ३९ मि. मी. पाऊस झाला. काही तालुक्यात उघाड, तर काही तालुक्यात ढगाळ वातावरण हाेते. दरम्यान, गुरुवारपासून काहीसी उघडीप मिळण्याची शक्यता आहे.