7 injured as scorpio drive in drunk | नशेत स्कॉर्पिओ चालविल्यामुळे ७ जण जखमी
नशेत स्कॉर्पिओ चालविल्यामुळे ७ जण जखमी

ठळक मुद्देएसआरपीएफ जवानाचे कृत्य : नियंत्रण सुटल्यामुळे घडली घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नशा करून वाहन चालविणाऱ्या एसआरपीएफ जवानाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे सात जण जखमी झाले. ही घटना सोमवारी सकाळी ११.३० वाजता टेका नाका परिसरात घडली. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. या घटनेत आरोपी एसआरपीएफ जवानही जखमी झाला आहे.
आरोपी उमाकांत चहारे एसआरपीएफ मध्ये हवालदार आहे. तो सकाळी ११.३० वाजता स्कार्पिओ क्रमांक एम. एच. ४०, बी. जे. ५५७५ ने जात होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उमाकांतने नशा केली होती. टेका नाका ते कपिलनगर दरम्यान रंगीला पंजाब हॉटेलसमोर उमाकांतचे स्कार्पिओवरून नियंत्रण सुटले. त्याने स्कुटीवर स्वार लक्की देविदास हिरकन (१८) आणि रवि मुरलीधर पेंदाम (२१) रा. म्हाडा क्वार्टर यांना धडक दिली. लक्कीच्या घरी बांधकाम सुरु असल्यामुळे तो रविसोबत सिमेंटचे पोते आणण्यासाठी जात होता. त्यानंतर उमाकांतने कैलाश मदनलाल उईके (४३) रा. मानवतानगर, टेका नाका यांना जखमी केले. घटनास्थळी गर्दी जमा झाली. स्कार्पिओला आपल्याकडे येताना पाहून नागरिक जीव मुठीत घेऊन पळाले. लक्की, रवि आणि कैलाश यांच्यासह सात-आठ जणांना जखमी केल्यानंतर स्कार्पिओ उलटली. यामुळे उमाकांतही जखमी झाला. स्कार्पिओ उलटल्यामुळे नागरिक गोळा झाले. त्यांनी पोलिसांना सूचना देऊन जखमींना रुग्णालयात पाठविले. नागरिकांनी उमाकांतला घेराव घातला. दरम्यान जरीपटकाचे सहायक उपनिरीक्षक संजय ढवळे, हवालदार कमलाकर तुनकिलवार सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. उमाकांतला नशेच्या अवस्थेत पाहून नागरिकांनी त्याला धडा शिकविण्याची मागणी केली. पोलिसांनी नागरिकांना शांत केले. त्यांनी उमाकांतला मेयो रुग्णालयात रवाना केले. रुग्णालयात पोहोचल्यानंतर तो घटनेबाबत माहिती देत नव्हता. दरम्यान जखमींचे नातेवाईक रुग्णालयात पोहोचले. त्यांनी उमाकांतविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करून गोंधळ घातला. उमाकांतची अवस्था पाहून पोलिसांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली. त्यात तो नशेत असल्याचे उघड झाले. जखमी नागरिकांच्या वाहनांकडे पाहून कोणालाही ते जीवंत असतील असे वाटत नव्हते. घटनेच्या वेळी उमाकात वर्दीत होता. तो नशेत असताना ड्युटीवर जात असल्याची शंका आल्यामुळे पोलिसांनी त्याची चौकशी केली. परंतु त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. जरीपटका पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांना घटनेची माहिती दिली. पोलीस एसआरपीएफच्या वरिष्ठ अधिकाºयांना अहवाल पाठविणार आहेत. उमाकांत विरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करून तपास सुरु करण्यात आला आहे.

Web Title: 7 injured as scorpio drive in drunk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.