‘एपीएमसी’मध्ये अग्निशमन यंत्रणा बसविण्यासाठी ७ कोटींची निविदा; डिसेंबरमध्ये लागली होती भीषण आग
By मोरेश्वर मानापुरे | Updated: October 5, 2023 21:04 IST2023-10-05T21:04:37+5:302023-10-05T21:04:56+5:30
मंजूरी मिळण्यास उशीर; डिसेंबर-२०२२ मध्ये कळमन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मिरची बाजारात मध्यरात्री लागलेल्या आगीत कोट्यवधींचा माल जळाला होता.

‘एपीएमसी’मध्ये अग्निशमन यंत्रणा बसविण्यासाठी ७ कोटींची निविदा; डिसेंबरमध्ये लागली होती भीषण आग
नागपूर : कळमन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत (एपीएमसी) अग्निशमन यंत्रणा बसविण्यासाठी व्यवस्थापन मंडळाने २७ सप्टेंबरला ७ कोटी रुपयांची निविदा काढली आहे. त्यानुसार बाजारात अद्ययावत यंत्रणा उभारण्यात येणार असून त्यामुळे कृषी मालाचे संरक्षण होण्याची अपेक्षा व्यापारी व्यक्त करीत आहेत.
डिसेंबर-२०२२ मध्ये कळमन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मिरची बाजारात मध्यरात्री लागलेल्या आगीत कोट्यवधींचा माल जळाला होता. त्यानंतर समितीच्या व्यवस्थापन मंडळाने निर्णय घेत संपूर्ण १५० एकरातील बाजारपेठांच्या सुरक्षेसाठी अग्निशमन यंत्रणा बसविण्याचा तातडीने निर्णय घेतला आणि प्रस्ताव तयार करून मंत्रालयात संबंधित विभागाकडे पाठविण्यात आला. या कामाच्या निविदा काढण्यासाठी सप्टेंबर महिन्यात मंजूरी मिळाली. त्यानुसार निविदा काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे एपीएमसीला आगीपासून सुरक्षा कवच मिळणार आहे. जवळपास १५० एकरातील एपीएमसीमध्ये आतापर्यंत आगीच्या बचावासाठी कोणतीही पाऊले उचलण्यात आली नव्हती. त्यामुळे व्यापाऱ्यांना मालाच्या सुरक्षेसंदर्भात असुरक्षितता जाणवत होती. पण आता निविदा काढल्याने व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
प्रस्तावाला पुणे पीडब्ल्यूडीकडून तांत्रिक मंजूरी मिळाल्यानंतरच निविदा जारी केल्याचे अधिकाºयाने सांगितले. जवळपास २५ दिवसात निविदा प्रक्रिया पूर्णत्वास येईल. निविदेनुसार जवळपास १५० एकरात अग्निशमन यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्याकरिता भूमिगत पाइपलाइन टाकण्यात येईल. १५० हायड्रोलिक यंत्रणा लावण्यात येईल आणि प्रत्येक हॉलमध्ये ५ फायर अग्निरोधक बसविण्यात येणार आहे. लवकरच सिमेंट रस्ते बनविण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे अधिकारी म्हणाले.
डिसेंबर महिन्यात मिरची बाजाराला आग लागली होती. त्यानंतर काहीच दिवसात प्रस्ताव तयार करून संबंधित विभागाला पाठविला होता. पण कामासाठी निवदा काढण्याची मंजूरी आता मिळाली आहे. त्यानुसार निविदा काढण्यात आल्या आहेत. लवकरच कामाला सुरूवात होईल.
- अहमद शेख, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, नागपूर.