६२५ कोटींचे कर्ज वाटप
By Admin | Updated: July 26, 2015 03:15 IST2015-07-26T03:15:40+5:302015-07-26T03:15:40+5:30
जिल्ह्यात यंदा २०१५-१६ च्या खरीप हंगामात ६७,५५४ शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकांकडून ६२५ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले.

६२५ कोटींचे कर्ज वाटप
६७,५५४ शेतकऱ्यांना पुरवठा : पालकमंत्र्यांकडून बँकांचे अभिनंदन
नागपूर : जिल्ह्यात यंदा २०१५-१६ च्या खरीप हंगामात ६७,५५४ शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकांकडून ६२५ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. ८४१.५० कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून ही प्रक्रिया २२ जुलै पर्यंतची असून ७४.२८ ही पीककर्ज वाटपाची यंदाची टक्केवारी असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. ते जिल्ह्यातील कृषी अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत बोलत होते. रविभवन येथे पार पडलेल्या या बैठकीत आमदार सुधीर परवे, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावर्षी खरीप हंगामात राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपात महत्त्वाची भूमिका बजावल्याने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शासनाच्यावतीने सर्व बँकांचे अभिनंदन केले. तसेच यंदा पावसाने सुरुवातीला दमदार सुरुवात केल्यानंतर जुलैच्या मध्यात दडी मारली. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागेल, अशी भीती होती.परंतु पावसाच्या पुनरागमनाने ती भीती संपली असून राज्याच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना स्वत:कडील बियाणे वापरण्याचे आवाहन केले. यामुळे शेतकऱ्यांची बियाण्यांवर होणाऱ्या एकूण खर्चात ४० टक्के कपात झाली असल्याचे यावेळी सांगितले.
तसेच जिल्ह्यात पिकाखालील एकूण क्षेत्र पाहता खताचा ५० हजार मेट्रिक टन असा मुबलक साठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी खत पुरवठ्याबाबत काळजी करण्याचे कारण नसल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
यंदाचा खरीप हंगाम-२०१५ चा पीक पेरणी व पीक परिस्थितीचा अहवाल पाहता नागपूर जिल्ह्यात ११३८.८६ मि.मि. इतका सरासरी पाऊस असून २४ जुलै पर्यंत प्रत्यक्ष ४१७.५ मि.मी. म्हणजेच सरासरीच्या तुलनेच ३६.६५ टक्के पाऊस झाला आहे.(प्रतिनिधी)
दुबार पेरणीचे संकट दूर
जिल्ह्यातील खरीप हंगामात आतापर्यंत पीक पेरणी सर्वसाधारण क्षेत्राच्या प्रमाणात ८१.७० टक्के इतकी लागवड झाली आहे. यात २२ जुलैपर्यंत कापूस २ लाख हेक्टरपर्यंत लागवड झाली आहे. ही लागवड ९८.६९ टक्के इतकी आहे. सोयाबीन १ लाख २४ हजार ४०६ हेक्टर (८६ टक्के), भात १२ हजार १६८ हेक्टर (४ टक्के) आणि तूर ४८ हजार ५८९ हेक्टर (१०६ टक्के) इतकी लागवड झाली आहे जिल्ह्यात वेळेवर पाऊस पडल्याने दुबार पेरणीचे संकट दूर झाल्याचेही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.