६२ वर्षीय वृद्धाचा ३५ मिनिटांसाठी मृत्यू; डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे मरणाला हुलकावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 20:19 IST2020-12-10T20:19:08+5:302020-12-10T20:19:42+5:30
Nagpur News health नागपूर शहरातील ६२ वर्षीय वृद्धाला हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा श्वास तब्बल ३५ मिनिटांसाठी बंद पडला होता. या दरम्यान डॉक्टरांनी सतत दिलेला ‘सीपीआर’, विद्युत झटके (शॉक), तातडीने टाकलेले पेसमेकर व अॅन्जिओप्लास्टीमुळे त्या वृद्धाला जीवनदान मिळाले.

६२ वर्षीय वृद्धाचा ३५ मिनिटांसाठी मृत्यू; डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे मरणाला हुलकावणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील एक धक्कादायक, तेवढीच आश्चर्यकारक घटना पुढे आली आहे. ६२ वर्षीय वृद्धाला हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा श्वास तब्बल ३५ मिनिटांसाठी बंद पडला होता. या दरम्यान डॉक्टरांनी सतत दिलेला ‘सीपीआर’, विद्युत झटके (शॉक), तातडीने टाकलेले पेसमेकर व अॅन्जिओप्लास्टीमुळे त्या वृद्धाला जीवनदान मिळाले. ही दुर्मिळातील दुर्मिळ घटना असल्याचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत जगताप यांनी सांगितले.
दत्तावाडी येथील या वृद्धाला ८ डिसेंबर रोजी अचानक घरीच छातीत दुखू लागले. शुद्धही हरवली. नातेवाईकांनी विवेका हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांच्या तपासणीत श्वास थांबल्याचे लक्षात येताच तातडीने ‘शॉक’ दिला. यामुळे ‘ईसीजी’मध्ये हृदय सुरू झाल्याचे दिसून आले. परंतु काहीच सेकंदात रुग्णाला हृदयविकाराचा झटका आला. हृदय पुन्हा बंद पडले. डॉक्टरानी तोंडात नळी टाकून ऑक्सिजन देणे सुरू केले. ‘सीपीआर’ (‘कार्डिओ पल्मोनरी रेसूसिटेशन) म्हणजे, हाताने छातीवर भार देऊन ती खाली दाबण्याची व ‘शॉक’ देण्याची प्रक्रिया सुरू ठेवली. रुग्णाला ‘कॅथलॅब’मध्ये आणले. डॉ. जगताप यांनी सांगितले, सलग २० मिनिटांच्या या प्रक्रियेमुळे हृदय सुरू झाले. परंतु ठोके फारच मंद होते. यामुळे तातडीने पेसमेकर टाकले. परंतु त्यानंतर पुन्हा हृदय बंद पडले. पुन्हा सीपीआर आणि शॉक देणे सुरू झाले. याच दरम्यान ‘अॅन्जिओग्राफी’ व ‘अॅन्जिओप्लास्टी’ करण्यात आली आणि ३५ मिनिटांनंतर बंद हृदयाची रक्तवाहिनी उघडली. हृदय पूर्ववत धडधडायला लागले. दुसऱ्या दिवशी रुग्णाला बरे वाटू लागले. चार दिवसानंतर रुग्णाला रुग्णालयातून सुटीही देण्यात आली. आज या घटनेला एक महिन्याचा कालावधी होत आहे. रुग्णाची प्रकृती स्थिर आहे.
-सीपीआरमुळे मेंदूला रक्तपुरवठा
डॉ. जगताप यांनी सांगितले की, हृदय बंद पडल्यानंतर मेंदूतील पेशी पाच मिनिटांपेक्षा कमी वेळेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मरायला लागतात. परंतु या रुग्णाला निरंतर ‘सीपीआर’ देणे सुरू असल्याने त्यांच्या मेंदूला रक्तपुरवठा कमी-अधिक होत होता. यामुळे रुग्ण वाचला. डॉक्टरांच्या सामूहिक प्रयत्नांचे हे यश आहे. यात डॉ. पीयूष चवदलवार, डॉ. अजय साखरे, डॉ. निखील बालंकी, तंत्रज्ञ मनोज टिपले, उमेश अलोणे, परिचारिका कल्पना ठोंबरे व राखी रविदास आदींचा सहभाग होता.
-हृदय बंद पडल्यास १४ ते २२ टक्केच रुग्ण वाचतात
हॉस्पिटलमध्ये रुग्णाला ‘कार्डियाक अरेस्ट’ म्हणजे हृदय बंद पडल्यास १४ ते २२ टक्केच रुग्ण वाचतात. तर घरी १० टक्केच रुग्ण वाचतात. या रुग्णाला सलग ३५ मिनिटे ‘सीपीआर’ व २० वेळा शॉक देण्यात आले. ही दुर्मिळ घटना आहे.
-डॉ. प्रशांत जगताप
हृदयविकार तज्ज्ञ