वक्फची महाराष्ट्रातील ६० टक्के जमीन आहे अतिक्रमणाच्या विळख्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 14:29 IST2025-04-04T14:28:53+5:302025-04-04T14:29:15+5:30
Nagpur : महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाजवळ आहे ९८ हजार ७०० एकर जमीन

60 percent of Waqf land in Maharashtra is under encroachment
रियाज अहमद
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: संसदेत वक्फ बोर्ड संशोधन बिलावर मंथन सुरू आहे. दरम्यान हाती आलेल्या माहितीनुसार, वक्फची महाराष्ट्रातील ६० टक्के जमीन अतिक्रमणाच्या विळख्यात आहे, एका सर्वेत ही माहिती पुढे आली आहे. या जमिनीला अतिक्रमणाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी फारशी प्रभावी कारवाई झालेली नाही.
या जागेसाठी आहे वाद
नागपूरमध्ये वक्फच्या विविध संपत्तींचा वाद चर्चेत आहे. यातील एक प्रकरण सदरमधील एका अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेच्या मैदानाशी जुळला आहे. याशिवाय सतरंजीपुरा मस्जिद कमिटीच्या गोधनी येथील जमिनीचे प्रकरणही चर्चेत आहे. सन २०१६-१७ दरम्यान राज्यातील वक्फ बोर्डाने ताजाबाद दर्गाहची जमीन वक्फची असल्याचा दावा केला होता. हे प्रकरणही बरेच चर्चेत आले होते. नागपुरातील वक्फ बोर्ड कार्यालयात वक्फ संपत्तीच्या नोंदणीचे अनेक प्रस्ताव प्रलंबित आहेत.
छत्रपती संभाजीनगरात सर्वाधिक मालमत्ता
वक्फजवळ असलेल्या एकूण जमिनीपैकी सर्वाधिक ५० टक्के जमीन मराठवाड्यात आहे. त्यातही सर्वाधिक संपत्ती छत्रपती संभाजीनगरात असल्याची माहिती सर्व्हेत नोंदवली आहे. त्यानंतर बीड, जालना आणि परभणीतही मोठी संपत्ती वक्फकडे आहे. विदर्भात केवळ नागपूर आणि अमरावतीतच वक्फकडे जमीन आहे. नागपूर शहर आणि जिल्हा मिळून सुमारे ४० ते ५० एकर जमीन वक्फकडे आहे.
गेल्यावर्षी झाला होता सव्हें
राज्य वक्फ बोर्डाचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा यांच्या पुढाकाराने गेल्यावर्षी राज्यात वक्फच्या जमिनीसंबंधाने एक महत्त्वपूर्ण सर्व्हे करण्यात आला होता. त्याचा अहवाल वक्फकडे सुरक्षित आहे. सर्व्हेनुसार, राज्यातील वक्फ बोर्डाजवळ असलेल्या जमिनीपैकी सुमारे ६० टक्के जमिनीवर अतिक्रमण आहे. सर्वाधिक अतिक्रमण मराठवाड्यातील जमिनीवर असल्याचा दावा सर्व्हेतून करण्यात आला होता.