६० टक्के परीक्षार्थी ‘एआयपीएमटी’ला गैरहजर
By Admin | Updated: July 26, 2015 03:16 IST2015-07-26T03:16:33+5:302015-07-26T03:16:33+5:30
केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाच्यावतीने (सीबीएसई) घेण्यात आलेल्या अखिल भारतीय प्री-मेडिकल टेस्टमध्ये ...

६० टक्के परीक्षार्थी ‘एआयपीएमटी’ला गैरहजर
नागपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाच्यावतीने (सीबीएसई) घेण्यात आलेल्या अखिल भारतीय प्री-मेडिकल टेस्टमध्ये (एआयपीएमटी) नागपूर केंद्रावर सरासरी ६० टक्के विद्यार्थी गैरहजर दिसून आले. विद्यार्थ्यांच्या या अनुपस्थितीवर परीक्षा केंद्रावरील अधिकाऱ्यांनीही आश्चर्य व्यक्त केले.
या परीक्षेसाठी नागपुरात एकूण ४२ केंद्रे सज्ज करण्यात आली होती. त्यावर एकूण २५ हजार विद्यार्थी परीक्षा देणार होते. परंतु या केंद्रावर सुमारे ७० ते ८२ टक्के विद्यार्थी गैरहजर होते. परंतु यावर सीबीएसईच्या नागपूर येथील परीक्षा नियंत्रण कार्यालयातर्फे कोणत्याही प्रतिक्रीया देण्यास नकार दिला. मात्र काही अधिकाऱ्यांच्या मते, ‘एआयपीएमटी’चा अपवाद वगळता इतर सर्व राष्ट्रीय व राज्यस्तरीय मेडिकल प्रवेश पूर्व परीक्षा व संबंधित प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी या परीक्षेला गैरहजर दिसून आले. विशेष म्हणजे, नागपुरातील परीक्षा केंद्रावर देशभरातील विद्यार्थी परीक्षा देणार होते. परंतु सर्वच ठिकाणी मेडिकल प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याने बाहेरचे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचले नाही. परीक्षार्थीच्या या गैरहजरीने परीक्षेतील स्पर्धा कमी झाली आहे. दुसरीकडे पालकांच्या मते, सीबीएसईच्या कठोर नियमांमुळे अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले आहे.
अनेक विद्यार्थ्यांना नागपूरपासून सुमारे २५ किलो मीटरवर परीक्षा केंद्रे देण्यात आली होती. असे असताना परीक्षा केंद्रांवर पाच मिनिटे उशिरा पोहोचणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जात होता.
अशाप्रकारे काटोल रोडवरील एका सीबीएसई शाळेतील परीक्षा केंद्रावर २५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना परत पाठविण्यात आले. अनेक पालकांनी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची विनंती केली. परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही.
परीक्षा नियंत्रण कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या मते, यासंबंधी विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवेशपत्रावर सर्व सुचना देण्यात आल्या होत्या. त्यावर सकाळी ९.३० वाजतानंतर परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही, असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता.
असे असताना विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी प्रवेश केंद्रावर सकाळी ७.३० वाजतापासून प्रवेश दिला जात होता. अशा स्थितीत उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केंद्राला दोष देता येणार नाही, असे ते म्हणाले.