महाराष्ट्रातील ५३ नद्या अति प्रदूषणाच्या विळख्यात ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:08 IST2021-03-15T04:08:04+5:302021-03-15T04:08:04+5:30
जागतिक नदी संवर्धन दिन विशेष निशांत वानखेडे नागपूर : औद्याेगिकरणाच्या व शहरीकरणाच्या सपाट्यात विविध प्रकारचे प्रदूषण माेठ्या प्रमाणात वाढले ...

महाराष्ट्रातील ५३ नद्या अति प्रदूषणाच्या विळख्यात ()
जागतिक नदी संवर्धन दिन विशेष
निशांत वानखेडे
नागपूर : औद्याेगिकरणाच्या व शहरीकरणाच्या सपाट्यात विविध प्रकारचे प्रदूषण माेठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यात जल प्रदूषणाची स्थिती दयनीय झाली असून नद्यांची अवस्था दिवसेंदिवस वाईट हाेत चालली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (सीपीसीबी) च्या सर्वेक्षणानुसार देशातील ३५१ लहान-माेठ्या नद्यांचे किनारे अति प्रदूषणाच्या विळख्यात सापडले असून त्यात महाराष्ट्रातील ५३ नद्यांचा समावेश आहे. यामध्ये विदर्भातील वैनगंगा, वर्धा या माेठ्या नद्यांसह कन्हान, वेणा यांचा समावेश आहे. नागनदी, मरू नदी आदी नद्यांचे अस्तित्वही संपुष्टात आले आहे, हे विशेष.
सीपीसीबीने २०१८ मध्ये हा अहवाल जाहीर केला आहे. त्यानुसार हिंडन नदीच्या धर्तीवर प्रदूषण नियंत्रणाचा ॲक्शन प्लॅनही सादर केला हाेता. मात्र दुर्दैव म्हणजे या कृती याेजनेचा हवा तसा लाभ दिसून येत नाही. मंडळाच्या यादीमध्ये मुंबईची उल्हास आणि मिठी नदी सर्वाधिक प्रदूषित म्हणून गणली गेली आहे. मात्र यादीत वैनगंगा व वर्धा नदीचा समावेश असल्याने विदर्भाचीही चिंता वाढली आहे. मंडळाने यामध्ये विशिष्ट किनाऱ्यांचा उल्लेख केला आहे.
मध्य प्रदेशातून उगम पावलेल्या वैनगंगा नदीचा तुमसर ते आष्टीपर्यंतचा ७०७ किलाेमीटरचा विस्तार अति प्रदूषित म्हणून गणला गेला आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या किनाऱ्यांचाही समावेश आहे. वर्धा नदीचा घुग्घूस ते राजुरापर्यंतचा ५१ किलाेमीटरचा विस्तार प्रदूषणाच्या उच्च श्रेणीत आहे. कन्हान नदीचा नागपूर ते भंडारा (कामठी, कन्हान, पिंपरी, माैदा) पर्यंतचा १०० कि.मी.चा विस्तार अति प्रदूषणाच्या श्रेणीत असल्याचे नमूद आहे. वेणा नदी ही कावडघाट ते हिंगणघाटच्या किनारी प्रदूषित झाल्याचे या अहवालात नमूद आहे.
वैनगंगा, कन्हान नदीच्या संवर्धनाचा आराखडा
नदीच्या पाण्यात असलेल्या बीओडीच्या स्तरावरून प्रदूषणाची स्थिती निर्धारित करण्यात आली आहे. उल्लेखनीय म्हणजे या सर्वेक्षणानंतर देशातील इतर नद्यांप्रमाणे विदर्भातील वैनगंगा, कन्हान, वर्धा या नद्यांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार केला हाेता. मात्र या प्लॅनचे पुढे काय झाले, याबाबत कुणीही सांगायला तयार नाही.
औद्याेगिक व सांडपाणी सर्वाधिक कारणीभूत
- कारखाने, उद्याेगातून निघणारे रासायनिक प्रदूषण हे नद्यांच्या प्रदूषणासाठी सर्वाधिक कारणीभूत आहे.
- त्यापाठाेपाठ शहरातील घरांमधून निघणारे सिव्हेज व सांडपाणी हेही प्रदूषणाचे महत्त्वपूर्ण कारण आहे. नागपूर शहराचा विचार केला असता, शहरातून निघणारे ६५० एमएलडीपैकी ३४० एमएलडी सांडपाणी ट्रिट केले जाते, तर उर्वरित सांडपाणी थेट कन्हान व वैनगंगेला जाऊन मिळते.
- याशिवाय निघणारा कचरा थेट नदीत फेकणे, पर्यटकांचा कचरा नदीत जाणे, तसेच प्लास्टिक प्रदूषण सर्वात भयानक ठरले आहे.
- किनाऱ्यावर असलेले गाव आणि शहरातील मृतकांचे अंत्यसंस्कार हेही प्रदूषणास कारणीभूत ठरत आहे.
- नदीतून वाळूचा अमर्याद उपसा नद्यांच्या अस्तित्वावर संकटकारक ठरला आहे.