नागपुरात कुरिअर बॉयजवळ आढळले सोन्याचे ५० लाखांचे दागीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 21:24 IST2019-10-18T21:20:17+5:302019-10-18T21:24:49+5:30
शुक्रवारी रेल्वे सुरक्षा दलाच्या गुन्हे शाखेने आणि आयकर विभागाने केलेल्या संयुक्त कारवाईत मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेसमधील एका कुरियर बॉयजवळ ५० लाखाचे दागिने आढळले.

नागपुरात कुरिअर बॉयजवळ आढळले सोन्याचे ५० लाखांचे दागीने
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शुक्रवारी रेल्वे सुरक्षा दलाच्या गुन्हे शाखेने आणि आयकर विभागाने केलेल्या संयुक्त कारवाईत मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेसमधील एका कुरियर बॉयजवळ ५० लाखाचे दागिने आढळले.
रेल्वे सुरक्षा दलाच्या गुन्हे शाखेला आणि आयकर विभागाला रेल्वेगाडी क्रमांक १२२८९ मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेसमधून सोन्याच्या दागिन्यांची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे आरपीएफच्या गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक शिवराम सिंह प्लॅटफार्म क्रमांक ८ वर पोहोचले. त्यांना आरपीएफचे हेड कॉन्स्टेबल शशिकांत गजभिये, राम यादव आणि आयकर विभागाचे अतुल आहुजा आणि त्यांची चमू तेथे आढळली. दुरांतो एक्स्प्रेस सकाळी ७.२० वाजता प्लॅटफार्म क्रमांक ८ वर आली. त्यानंतर त्यांनी संयुक्तरीत्या दुरांतो एक्स्प्रेसची तपासणी सुरू केली. यात एस ३ कोचमध्ये त्यांना एक व्यक्ती संशयास्पद स्थितीत आढळली. चौकशीत त्याने आपले नाव बालू (५०) रा. अकोला असे सांगितले. आपण कुरिअर बॉय असून जवळ ५० लाख रुपये किमतीचे सोन्याचे १.८८७ किलोचे दागिने असल्याची माहिती दिली. त्यानंतर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यास ताब्यात घेतले. ही कारवाई रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त भवानी शंकर नाथ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
दागिन्यांचे कागदपत्र योग्य
आयकर विभागाचे संचालक (अन्वेषण) जय काजला यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आयकर विभागाने जप्त केलेल्या सोन्याच्या दागिन्यांचे बिल संबंधीत व्यक्तीने दाखविले असून ते योग्य असल्याची माहिती दिली. त्यामुळे या प्रकरणात गुन्हा दाखल होणार नसून कागदोपत्री कारवाईनंतर हे दागिने परत करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.