नागपुरातील दोसरभवन चौकाजवळ बेवारस बॅगेत आढळले ५० डेटोनेटर्स अन १५ जिलेटिनच्या कांड्या
By योगेश पांडे | Updated: April 7, 2026 15:17 IST2026-04-07T15:16:44+5:302026-04-07T15:17:16+5:30
संवेदनशील भागात स्फोटके आढळल्याने पोलीस यंत्रणेत खळबळ : परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात

50 detonators and 15 gelatin sticks found in an abandoned bag near Dosarbhavan Chowk in Nagpur
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीतील सेंट्रल एव्हेन्यूवरील दोसरभवन चौकाजवळ एका बेवारस बॅगेत ५० डेटोनेटर्स आणि जिलेटिनच्या १५ कांड्या आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. दोसरभवन मेट्रो स्थानकाच्या मागील एका घराच्या मोकळ्या जागेत काही दिवसांपासून ही बॅग पडली होती. घरमालकाने पोलिसांना माहिती दिल्यानंतर या प्रकाराचा खुलासा झाला.
दोसरभवन चौकाजवळ डॉ.लांजेवार यांचे घर आहे. त्यांच्या घराच्या मोकळ्या जागेत लहान बाग आहे. रस्त्याच्या दिशेने असलेल्या बाजूस मागील दोन महिन्यांपासून एक बेवारस बॅग पडली होती. मंगळवारी सकाळी लांजेवार यांच्या मुलाला ती बॅग दिसली व त्याने बॅगची पाहणी केली असता त्यांना त्यात जिलेटिनच्या कांड्या दिसल्या. लांजेवार कुटुंबाने तातडीने पोलिसांना माहिती दिली. बेवारस बॅगेत स्फोटके असल्याचे कळल्यावर वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच बीडीडीएसचे पथक तेथे पोहोचले. बॅगची तपासणी केली असता त्यात ५० डेटोनेटर्स, जिलेटिनच्या १५ कांड्या व ८ कनेक्टर्स आढळले. संबंधित स्फोटके नेमकी कधीपासून तेथे होती व ती बॅग कुणी तेथे आणून टाकली याचा तपास सुरू करण्यात आला आहे.
या प्रकारानंतर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सोबतच संबंधित स्फोटके तपासण्यासाठी ‘पेसो’ तसेच फॉरेन्सिकची पथकेदेखील पोहोचली. नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर स्फोटक कारखाने आहेत. त्यातीलच एखाद्या कारखान्यातील ही स्फोटके असण्याची शक्यता आहे. दोसरभवन चौकाजवळचा भाग संवेदनशील मानण्यात येतो. त्यामुळे तेथे स्फोटकांची बेवारस बॅग आढळल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित स्फोटके विहीर खोदणे किंवा खाणकामासाठी वापरल्या जाणार होती की त्यामागे आणखी काही कट होता याचा तपास सुरू आहे.