रोज ५० प्रसूती, तरीही रुग्णालयात आदर्श स्वच्छता : 'कायाकल्प'ने केला गौरव

By सुमेध वाघमार | Updated: June 23, 2025 18:32 IST2025-06-23T18:27:25+5:302025-06-23T18:32:00+5:30

Nagpur : स्वच्छता, संसर्ग नियंत्रण आणि पर्यावरणपूरक उपाययोजनांसाठी सन्मान

50 deliveries every day, yet the hospital has ideal cleanliness – 'Kayakalp' brings glory | रोज ५० प्रसूती, तरीही रुग्णालयात आदर्श स्वच्छता : 'कायाकल्प'ने केला गौरव

Daga Hospital gets 'Kayakalp Award' of Rs. 20 lakhs

नागपूर: विदर्भातील महिलांच्या आरोग्यासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयाला या वर्षाचा प्रतिष्ठेचा 'कायाकल्प पुरस्कार २०२४-२५' प्रदान करण्यात आला. स्वच्छता, आरोग्य, संसर्ग नियंत्रण आणि पर्यावरणपूरक उपाययोजना प्रभावीपणे राबविल्याबद्दल हा सन्मान मिळाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप २० लाख रुपये असून, हा निधी रुग्णसेवेच्या सोयींसाठी वापरला जाईल, अशी ग्वाही रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप सुरजसिंग मडावी यांनी दिली.
    

'स्वच्छ भारत अभियानांतर्गत' भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे दरवर्षी 'कायाकल्प पुरस्कार' दिला जातो. २०१५ पासून हा पुरस्कार देशभरातील सार्वजनिक आरोग्य सुविधांच्या मूल्यांकनानंतर दिला जातो. या मूल्यांकनासाठी रुग्णालयातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, संसर्ग नियंत्रण, सहाय्यक सेवा, स्वच्छता प्रोत्साहन आणि २०२१ पासून समाविष्ट करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक उपाययोजना यासारख्या कठोर निकषांचा आधार घेतला जातो. डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयाने २०२४-२५ चा हा पुरस्कार उपविजेतेपद पटकावून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. डॉ. मडावी यांनी सांगितले, हा पुरस्कार आमच्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. रुग्णालयाची उत्कृष्ट कामगिरी, स्वच्छता आणि शाश्वतता राखण्याच्या आमच्या समर्पणाचे हे प्रतीक आहे. हा सन्मान आमच्या संपूर्ण कर्मचारी वर्गाच्या कठोर परिश्रम आणि एकजुटीचे प्रतिबिंब आहे.

रुग्णालयात रोज ४० ते ५० प्रसूती
प्रदीर्घ काळापासून विदर्भातील स्त्रियांना अविरत आणि दर्जेदार सेवा देणारे डागा स्मृती शासकीय स्त्री रोग रुग्णालय ही एक आदर्श संस्था म्हणून नावारूपाला आले आहे. ३६५ खाटा असलेल्या या रुग्णालयात रोज सरासरी ४० ते ५० प्रसूती होतात. त्यामुळे रुग्णांसोबतच त्यांच्या नातेवाईकांचीही २४ तास वर्दळ येथे असते. रुग्णसेवेसोबतच हे रुग्णालय वैद्यकीय शिक्षणातही महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. येथे एमबीबीएस/पीजी अभ्यासक्रम, एएनएम प्रशिक्षण आणि इतर प्रगत वैद्यकीय सेवा प्रदान केल्या जातात. मिळालेला हा पुरस्कार रुग्णालयाच्या उत्कृष्ट सेवा आणि स्वच्छतेच्या बांधिलकीवर शिक्कामोर्तब करतो.

Web Title: 50 deliveries every day, yet the hospital has ideal cleanliness – 'Kayakalp' brings glory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.