व्हेरिफिकेशनअभावी अडकले ५ हजार पासपोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 16:54 IST2024-05-15T16:54:00+5:302024-05-15T16:54:50+5:30
टीसीएसचे सॉफ्टवेअर बनले डोकेदुखी: पोलिसांना मिळत नाही माहिती, नागरिकांची कोंडी

5 thousand passports stuck due to lack of verification
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नॉर्मल पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांच्या कागदपत्रांचे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर पासपोर्ट ऑफिसकडून ते पडताळणीसाठी पोलिसांकडे पाठविले जातात. मात्र, अर्ज करणाऱ्यांची माहिती पोलिसांना मिळेनासी झाल्याने नागपूर विभागाच्या पासपोर्ट कार्यालयांतर्गत गेल्या दीड महिन्यात सुमारे ५ हजार पासपोर्ट अडकून पडले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक काम असूनही संबंधित नागरिक विदेशवारीपासून वंचित झाले आहेत.
या समस्येचे मूळ कारण टीसीएस कंपनीचे नवीन सॉफ्टवेअर आहे.त्यामुळेच नागरिकांना त्रास होत आहे. पासपोर्ट सेवा कार्यक्रम अपग्रेड करण्यात आला असून, पायलट प्रोजेक्ट अंतर्गत नागपूर आणि भूवनेश्वरमध्ये १ एप्रिल २०२४ पासून तो सुरू करण्यात आला आहे.
सॉफ्टवेअर इंटरफेसच्या डेव्हलपमेंट आणि फंक्शनिंगची जबाबदारी टीसीएसकडे आहे. मात्र, जे सॉफ्टवेअर अपग्रेड करण्यात आले ते व्यवस्थित चालत नाही. योग्य प्रकारे टेस्ट न करताच ऑनलाइन करण्यात आले. त्यामुळे सुरुवातीपासूनच यात तांत्रिक अडचणी येत आहेत. ५ हजार अर्जदारांचे नॉर्मल पासपोर्ट अडकून पडले आहेत. सर्वांत मोठी तांत्रिक अडचण पोलिस व्हेरिफिकेशनमध्ये येत आहे. कारण पासपोर्ट ऑफिसकडून पाठविण्यात आलेली माहितीच पोलिसांना मिळत नाही.
एमपोलिस अॅपमध्ये दिसतच नाही डाटा
पासपोर्ट ऑफिसमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशननंतर पोलिस व्हेरिफिकेशनसाठी रिक्वेस्ट जाते, ती पोलिसांना त्यांच्या एमपोलिस अॅपमध्ये दिसतच नाही. पोलिसांकडून पडताळणी अहवाल मिळाल्यानंतरच पासपोर्ट मंजूर होऊन प्रिटसाठी जातो. मात्र, १ एप्रिलपासून नवीन सॉफ्टवेअर कार्यान्वित झाल्यानंतर पोलिसांना त्यांच्या अॅपवर डाटा मिळत नसल्याने पोलिस व्हेरिफिकेशन अडून पडले आहेत. परिणामी, पासपोर्ट बनणे बंद आहे. मात्र, तत्काळ पासपोर्ट बनणे सुरू आहे. कारण यात पासपोर्ट बनविल्यानंतर व्हेरिफिकेशन केले जाते. मात्र, त्याचा कोटा नॉर्मलच्या तुलनेत खूप कमी आहे.
रद्द करावी लागत आहे हॉलिडे बुकिंग
अनेकांनी उन्हाळ्यात विदेशात हॉलिडे बुकिंग करून ठेवली आहे. मात्र, पासपोर्ट मिळत नसल्याने त्यांना बुकिंग कॅन्सल करावी लागत आहे. आधी नॉर्मल पासपोर्ट २१ दिवसात मिळत होता. मात्र, आता दीड महिना होऊनही मिळेनासा झाला आहे. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, नोकरीसाठी जाणारे, व्यापारी आणि ऑफिस दूरसाठी जाणाऱ्यांना या समस्येचा फटका बसत आहे. अडचण घेऊन पोहोचणारांना पासपोर्ट ऑफिसमधून रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.
अनेकांचे टूर अधांतरी
युरोपमधील काही देशांसह न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियात वैध पासपोर्टसह पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेटचीही (पीसीसी) आवश्यकता असते. पीसीसी प्रकरणात पोलिसांना आवेदकांचा डाटाच दिसून येत नसल्याने तेसुद्धा अडकून पडले आहेत. परिणामी अनेकांचे टूर अधांतरी आहेत.
टीसीएसने साधले मौन
या संबंधाने पासपोर्ट सेवा केंद्र नागपूरचे टीसीएस हेड प्रदीप्ता डे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. ते म्हणाले की यासंबंधाने तुम्ही क्षेत्रिय पासपोर्ट ऑफिससोबत संपर्क करा. तर, पासपोर्ट अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी समस्या मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू असून, लवकरच ही अडचण दूर होणार असल्याचे सांगितले.