संतापजनक! लहान मुलांच्या भांडणात पाच महिन्यांच्या गर्भवतीच्या पोटावर प्रहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2022 13:08 IST2022-06-04T12:53:26+5:302022-06-04T13:08:48+5:30
लोकांची संवेदना आणि माणुसकी हरवत चालली आहे का, असा प्रश्नच या घटनेतून उपस्थित होत आहे.

संतापजनक! लहान मुलांच्या भांडणात पाच महिन्यांच्या गर्भवतीच्या पोटावर प्रहार
नागपूर : लहान मुलांच्या भांडणात चक्क पाच महिन्यांच्या गर्भवतीला मारहाण करत तिच्या पोटावर प्रहार करण्याची घटना उपराजधानीत घडली. या घटनेमुळे इमामवाडा परिसरातील लोकांसोबतच पोलीसदेखील सुन्न झाले. गर्भवती महिलेचा सन्मान करणारी आपल्या देशाची परंपरा असताना अशा प्रकारे रानटी वर्तणूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे. लोकांची संवेदना आणि माणुसकी हरवत चालली आहे का, असा प्रश्नच या घटनेतून उपस्थित होत आहे.
इमामवाडा परिसरात सूरज व पूजा धामनिया हे दाम्पत्य आपल्या दोन मुलांसह राहते. पूजा पाच महिन्यांची गर्भवती असून, अशा परिस्थितीतदेखील त्या सामाजिक व कौटुंबिक वर्तुळात सरमिसळ होत असतात. त्यांच्या घराच्या पाठीमागे पूनम डिका ही महिला राहते. लहान मुलांमधील वादातून पूनमने पूजाशी अनेकदा भांडण केले. गुरुवारी रात्री सूरज हे आपल्या नातेवाइकांसोबत गप्पा करीत असताना अचानक त्यांचा मुलगा धावत आला व आईला पूनम मारहाण करीत असल्याचे सांगितले. सर्व लोक त्यांच्या घराकडे धावले. पूनम व तिचा अल्पवयीन मुलगा पूजा यांना मारहाण करीत होते. पूनमने पूजाचे केस ओढून त्यांना फरफटत नेले व त्यांच्या पोटावरदेखील प्रहार केले.
पूजा वेदनेने कळवळत असताना सूरजने मध्यस्थी केली. परंतु त्यांच्यावरदेखील काठीने प्रहार करण्यात आले. परिसरातील नागरिकांनी दोघांनाही तातडीने उपचारासाठी मेडिकलमध्ये दाखल केले. यानंतर त्यांचे नातेवाईक चिंका महेंद्र धामनिया यांनी इमामवाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. गर्भवतीला अशा प्रकारे मारहाण झाल्याचे ऐकून पोलीसदेखील अचंबित झाले. पोलिसांनी पूनमविरोधात गुन्हा दाखल केला आहे.