डियो गँगच्या ५ आरोपींना अटक, जामिनावर झाली सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 22:40 IST2020-09-22T22:37:14+5:302020-09-22T22:40:31+5:30
महिलांसोबत अभद्र व्यवहार करून, युवकाला जखमी करणाऱ्या डियो गँगच्या ५ सदस्यांना पाचपावली पोलिसांनी अटक केली. पण आरोपी तात्काळ जामिनावर सुटल्याने परिसरातील नागरिकांमध्ये दहशत आहे.

डियो गँगच्या ५ आरोपींना अटक, जामिनावर झाली सुटका
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महिलांसोबत अभद्र व्यवहार करून, युवकाला जखमी करणाऱ्या डियो गँगच्या ५ सदस्यांना पाचपावली पोलिसांनी अटक केली. पण आरोपी तात्काळ जामिनावर सुटल्याने परिसरातील नागरिकांमध्ये दहशत आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शेख अनीस ऊर्फ सोनू शेख हनीफ (२६), शेख परवेज ऊर्फ गुड्डू पचपन शेख रमजान (३२), अब्दुल लतीफ ऊर्फ हनीफ अब्दुल करीम (४२), शेख अफजल शेख बशीर (२७) रा. बंगाली पंजा व अजय ऊर्फ छोटू सुखलाल उईके (२८) रा. लेंडीपुरा यांचा समावेश आहे.
१९ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता संभाजी कासार रोडवर गजेंद्र सावरकर यांची वहिनी दर्शना सावरकर शेजारच्या महिलांसोबत बसली होती. त्यावेळी घटनेचा सूत्रधार सोनू आपल्या चार ते पाच सहकाऱ्यांसोबत तिथे आला. सोनू व त्याचे साथीदार रेशनचे धान्य खरेदी करीत होते. आरोपी महिलांना शिवीगाळ करून वाद घालू लागले. दर्शनाच्या पतीने महिलांसोबत बरोबर वागा, असे सांगितल्यावर सोनू त्याला धमकावून निघून गेला. १५ मिनिटांनंतर शस्त्रे घेऊन १० ते १२ साथीदारांसोबत तो परत आला. त्याने दुचाकी वाहनांची तोडफोड केली. शुभमला तलवारीने मारून जखमी केले. दिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीती निर्माण झाली होती.
पाचपावली पोलिसांनी हल्ल्याचा गुन्हा दाखल करून सोनू व त्याच्या चार साथीदारांना अटक केली. त्यांना न्यायालयात सादर केले असता, त्यांची जमानत झाली. परिसरातील नागरिकांना आरोपींना जामीन मिळाल्याच्या कारणावरून प्रश्न उपस्थित केले. पण पोलिसांनी नागरिकांना शांत करीत त्यांचा गुन्हेगारी रेकॉर्ड नसल्याचे सांगितले.
सोनू डियो गँगचा सदस्य
आरोपी सोनू डियो गँगचा सदस्य आहे. या टोळीद्वारे अवैध दारूची व मादक पदार्थाची विक्री करण्यात येते. पोलिसांनी नागरिकांचा रोष शांत करण्यासाठी आरोपींना अटक करून खानापूर्ती केल्याची नागरिकांची ओरड आहे. डियो गँगच्या सदस्यांनी लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात मोहाच्या दारूची विक्री केली. लॉकडाऊन संपल्याने ते रेशनच्या धान्याची खरेदी विक्री करीत आहेत. त्याचबरोबर ढिवरपुरा, झाडे चौक, लालगंज, बैरागीपुरा, बांगलादेश येथे दारूचे अड्डे चालवीत आहेत.